दीड वर्षानंतर विमानाचे मुंबईहून कोल्हापूरकडे उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 02:55 PM2019-09-02T14:55:15+5:302019-09-02T14:58:12+5:30
गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानातून मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. यामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत ट्रू जेटच्या ७२ आसनी विमानातून मुंबईहून ६३ प्रवासी कोल्हापूर विमानतळावर उतरले. यामध्ये माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता.
महापुराच्या छायेमुळे भारतीय विमान प्राधिकरणाने मोठा समारंभ टाळून ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हस्ते दीपप्रज्वलन केले व केक कापण्यात आला. रखडलेली विमानसेवा सुुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या.
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये एअर डेक्कन कंपनीने विमानसेवा सुरू केली होती; परंतु कंपनीअंतर्गत अडचणींमुळे ती बंद पडली. त्यानंतर आजतागायत विमानसेवा सुरू झाली नव्हती. तिला रविवारी मुहूर्त मिळाला. दुपारी दीडच्या सुमारास ट्रू जेट कंपनीचे विमान येणार असल्याने मुंबईकडे जाणारे प्रवासी व मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी आलेले नातेवाईक, मित्रमंडळी व प्राधिकरणाचे कर्मचारी यांमुळे हा परिसर फुलून गेला होता.
दुपारी २ वाजून २० मिनिटांंनी मुंबईहून ७२ आसनी विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. या ठिकाणी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे अग्निशमन दलाच्या बंबातून वॉटर शॉवर करीत या विमानाचे स्वागत करण्यात आले. विमानातून उतरलेल्या प्रवाशांचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
जिल्ह्यावर महापुराचे सावट असल्याने कोणताही झगमगाट किंवा मोठा सोहळा प्राधिकरणाच्या वतीने टाळण्यात आला. विमानतळावर छोटेखानी कार्यक्रमात ज्येष्ठ महिला प्रवाशाच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केक कापण्यात आला. काही वेळातच हे विमान ४३ प्रवाशांना घेऊन पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल आपल्याला मनस्वी आनंद आहे. ही सेवा अशीच सुरूराहावी. मुंबईहून कोल्हापूरपर्यंतचा विमानप्रवास हा सुखकर व आनंददायी राहिला.
- डॉ. डी. वाय. पाटील,
माजी राज्यपाल
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरूझाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. या विमानसेवेत आता कोणताही खंड न पडता त्यात सातत्य राहिले पाहिजे. तसेच वेळेचाही थोडा विचार झाला पाहिजे.
-के. के. खराडे,
प्रवासी, मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली विमानसेवा पुन्हा सुरूझाल्याने आनंद होत आहे; यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवर मोठे प्रयत्न झाले आहेत. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. विमानसेवेसाठी, प्रवाशांच्या बुकिंगसाठी चांगला प्रतिसाद आहे.
- कमल कटारिया,
संचालक, कोल्हापूर विमानतळ
पाच दिवस विमानाचे उड्डाण
अखेर केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेतून ट्रू जेट कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात यश आले आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे पाच दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. दुपारी एक वाजून ३५ मिनिटांनी हे विमान कोल्हापुरात उतरणार असून, १५ मिनिटे थांबून १ वाजून ५० मिनिटांनी ते मुंबईला रवाना होणार आहे.
‘इंडिगो-ट्रू जेट’ची भेट
मुंबईहून दुपारी कोल्हापूर विमानतळावर उतरलेले ट्रू जेट कंपनीचे विमान उतरले. त्याचवेळी तिरूपतीहून विमानतळावर येऊन थांबलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाने हैदराबादकडे उड्डाण केली. दोन्ही विमाने एकत्र आल्याचे दृश्य मोबाईलमधून टिपण्यासाठी उपस्थितांची झुंबड उडाली.