कोल्हापुरातील कळंबा कारागृहात सापडले पुन्हा ४६ मोबाइल, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:06 PM2024-08-08T12:06:55+5:302024-08-08T12:07:22+5:30

कारागृहातील कारभार पुन्हा चर्चेत

Again 46 mobiles were found in Kalamba Jail in Kolhapur | कोल्हापुरातील कळंबा कारागृहात सापडले पुन्हा ४६ मोबाइल, मात्र..

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात सापडले पुन्हा ४६ मोबाइल, मात्र..

कोल्हापूर : भोंगळ कारभारामुळे वारंवार चर्चेत असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा ४६ मोबाइल सापडले. मात्र, मोबाइल वापरणारा एकही कैदी कारागृह प्रशासनाला सापडला नाही. ५ मे ते ६ ऑगस्ट दरम्यान सापडलेल्या मोबाइलबद्दल तुरुंग अधिकारी अविनाश जयसिंग भोई (वय ४२, रा. कळंबा) यांनी बुधवारी (दि. ७) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

गेल्या सहा महिन्यांत कळंबा कारागृहात मोबाइल सापडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. कारागृहातील गैरप्रकार रोखण्यासाठी दोन अधिकाऱ्यांसह १२ जणांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. दोन अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. त्यानंतरही कारागृहात कैद्यांकडून मोबाइलचा वापर सुरूच आहे. कारागृह प्रशासनाने ५ मे ते ६ ऑगस्ट दरम्यान केलेल्या नियमित तपासणीत कारागृहातील स्वच्छतागृह, शौचालय, भिंतीमधील रिकाम्या जागा, मातीचे ढिगारे अशा ठिकाणी ४६ मोबाइल सापडले.

तसेच एक सीमकार्ड आणि चार बॅटरीही कारागृह पोलिसांच्या हाती लागल्या. मात्र, हे मोबाइल कोणाचे आहेत ? ते कारागृहात कोणी आणले ? त्याचा वापर कोणी केला ? याचा शोध पोलिसांना लागला नाही. तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांना अज्ञातावर गुन्हा दाखल केला. कारागृहाची झडती घेऊन अधिक तपास केला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक झाडे यांनी दिली.

मोबाइल आत जातात कसे?

कारागृहात मोबाइल जाऊ नयेत, यासाठी प्रवेशद्वारावर सर्व कैदी आणि कर्मचाऱ्यांची कसून तपासणी केली जाते. त्यानंतरही मोबाइल आत कसे पोहोचतात हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी कैद्यांना मोबाइल पुरविणारा एक कर्मचारी सापडला होता. त्याच्यावर बडतर्फीची कारवाई झाल्यानंतरही आत मोबाइल पोहोचत असल्याने कारागृहाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Web Title: Again 46 mobiles were found in Kalamba Jail in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.