पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी पुन्हा नवा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 12:57 AM2017-06-07T00:57:16+5:302017-06-07T00:57:16+5:30
आतापर्यंतच्या प्रस्तावांना केराची टोपली : जिल्हा परिषदेची प्रस्ताव पाठविण्यातच गेली साडेचार वर्षे
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा, बैठका, समित्या होत असल्या तरी गेली साडेचार वर्षे जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी केराची टोपली दाखविली आहे. आता पुन्हा ३१ गावांचा ९४ कोटी ५० लाख रुपयांचा नवा आराखडा तयार करण्यात आला असून, तो शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.
इचलकरंजी येथे काही वर्षांपूर्वी काविळीची साथ पसरल्यानंतर पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा पुढे आला. इचलकरंजी येथील दत्ता माने यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. याआधीही पंचगंगा प्रदूषणाबाबत याचिका दाखल झाल्या होत्या. या सर्व याचिका एकत्र करून क्रमांक १८३/२०१२ च्या याचिकेबाबत सध्या न्यायालयीन कामकाज सुरू आहे.
यानंतर १४ एप्रिल २०१२ पासून प्रदूषण रोखण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. या सर्व गावांचे सर्वेक्षण करून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रक्रिया राबवून पुणे येथील प्रिमुव्ह इन्स्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट या कंपनीला हे काम देण्यात आले. त्यासाठी ३७ लाख ५० हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. यातील २० लाख रुपये जिल्हा परिषदेने, तर १७ लाख ५० हजार रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजूर केले.
या कंपनीला १० जानेवारी २०१३ रोजी प्रत्यक्षात कार्यारंभ आदेश दिला व कंपनीने ३१ मे २०१३ रोजी याबाबतचा स्पष्ट अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला. यानंतर १३९ कोटी रुपयांचा ३० गावांचा सांडपाणी व ३६ गावांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला. त्यातील देखभालीचा खर्च कमी करून पुन्हा हा १०८ कोटी ९३ लाख रुपयांचा फेरप्रस्ताव राज्य पर्यावरण विभागाला सादर करण्यात आला.
हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाकडे पाठविल्यानंतर त्यात काढलेल्या त्रुटीही दूर करण्यात आल्या; परंतु केंद्र शासनाने अतिप्रदूषित शहरी भागांच्या प्रस्तावांना प्राधान्य दिल्याने हा प्रस्ताव परत पाठविण्यात आला. यानंतर मोठ्या गावांचा स्वतंत्र प्रस्ताव ‘नाबार्ड’कडे पाठविण्यात आला व सात गावांचा हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यांपैकी शिरोली (ता. हातकणंगले) आणि कोडोली (ता. पन्हाळा) येथील कामे सुरू आहेत. उर्वरित गावांसाठीचा प्रस्ताव राज्य नदीसंवर्धन विभागाकडे पाठविण्यात आला; परंतु याही विभागाने यासाठी निधी नसल्याचे सांगत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली.
सांडपाणी सोडणारी गावे
करवीर तालुका
बालिंगे, गांधीनगर, हळदी, हणमंतवाडी, कांडगाव, कोपार्डे, कोतोली, कुडित्रे, नागदेववाडी, परिते, श्ािंगणापूर, उचगाव, वाकरे, वळिवडे, वरणगे.
हातकणंगले तालुका
चंदूर, हातकणंगले, कबनूर, रुई, शिरोळ, तिळवणी
शिरोळ तालुका
नांदणी, नृसिंहवाडी, शिरोळ
अंशत: नदीप्रदूषण करणारी गावे
करवीर तालुका -कळंबा तर्फ ठाणे, मोरेवाडी, पाचगाव, पाडळी, वडणगे
हातकणंगले तालुका
हुपरी, पट्टणकोडोली, रुकडी