टोलबाबत पुन्हा संदिग्धता मुहूर्त चुकला
By admin | Published: May 30, 2014 01:46 AM2014-05-30T01:46:38+5:302014-05-30T01:57:18+5:30
‘आयआरबी’कडून अटींची पूर्तता नाही ; पूर्ण क्षमतेने संरक्षण देण्यास पोलिसांचा नकार
कोल्हापूर : टोलनाक्यांवरील संरक्षणासाठी तैनात पोलिसांसाठी पायाभूत सुविधा व वसुली कर्मचार्यांची माहिती ‘आयआरबी’ने न पुरविल्याने पोलिसांनी नाक्यांसाठी पूर्ण क्षमतेने बंदोबस्त पुरविलेला नाही. यामुळेच काल- बुधवारचा टोलवसुलीचा ‘आयआरबी’चा मुहूर्त चुकला. परिणामी टोल वसुली सुरू कधी सुरू होणार याबाबत पुन्हा संदिग्धता निर्माण झाली आहे. ‘आयआरबी’च्या अधिकार्यांनी २६ मे रोजी पोलिसांशी चर्चा करून शेड व शौचालय उभारणीचे काम सुरू केले,त्यासाठी तात्पुरते पोलीस संरक्षणही दिले. त्यामुळे आज टोलवसुली सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र टोलनाक्यांवरील वसुली कर्मचार्यांची माहिती पुरविण्याची पोलिसांची अट पूर्ण करण्यास आयआरबीने असमर्थता दर्शविली आहे. माहिती दिली नाही, या कारणास्तव पोलीस बंदोबस्त पुरविण्यात पोलीस प्रशासनाला दिरंगाई करता येणार नाही, असे ‘आयआरबी’चे म्हणणे असल्याचे समजते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने पोलिसांनी महापौर सुनीता राऊत व तीन आमदारांसह ३२ कार्यकर्त्यांना टोलनाक्यांचे नुकसान केल्याप्रकरणी तीन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची नोटीस बजावली. शहराच्या प्रथम नागरिकांना नोटीस म्हणजे शहरातील सहा लाख नागरिकांना नोटीस बजावल्याचा खेद व्यक्त करून सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, पायाभूत सुविधेसह पोलीस कर्मचार्यांना जेवण व नाष्टा, तसेच नाक्यांवरील कर्मचार्यांची संपूर्ण माहिती दिल्याशिवाय पूर्ण बंदोबस्त दिला जाणार नाही, यावर पोलीस प्रशासन ठाम आहे. (प्रतिनिधी)