हद्दवाढीच्या प्रश्नावरून पुन्हा रणकंदन
By admin | Published: August 14, 2016 12:36 AM2016-08-14T00:36:39+5:302016-08-14T01:04:18+5:30
समर्थक आक्रमक : विरोध करणाऱ्यांच्या घरांवर मोर्चे काढणार; विरोधक स्वातंत्र्यदिनी विरोधाचे ठराव करणार
कोल्हापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे गुणवत्तेच्या निकषांवर हद्दवाढीचा निर्णय तातडीने घ्यावा; अन्यथा कोल्हापुरात तीव्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने शनिवारी येथे झालेल्या बैठकीत दिला. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज, रविवारी महानगरपालिकेसमोर सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत धरणे धरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या. मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री पाटील हद्दवाढीबाबत सकारात्मक आहेत. त्यांनी गुणवत्तेवर हद्दवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता हद्दवाढीस विरोध करणाऱ्या आमदारांच्या घरांवर मार्चे काढावेत, त्यांना शहरात प्रवेशबंदी करावी, शहरात प्रवेश करणाऱ्यांवर प्रवेश कर आकारला जावा, शहरातील सुविधा देणे बंद करावे, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. बैठकीतील माहिती नंतर पत्रकारांना देण्यात आली.
शहराची हद्दवाढ ही आमच्या हक्काची असून, त्याला कोणी विरोध करू नये. अन्य आमदार विरोध करतात म्हणून हद्दवाढ थांबवू नये; तर केवळ गुणवत्ता आणि शहराची गरज या गोष्टी विचारात घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन महापौर रामाणे यांनी केले. जर हद्दवाढ झाली नाही, तर नाइलाजास्तव आम्हाला तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करावे लागेल, असे महापौर म्हणाल्या.
...तर प्रवेश कर लावावा लागेल
पुरावेळी पंचगंगा पूल दोन-तीन दिवस वाहतुकीसाठी बंद होता, त्यावेळी शहरात येण्यासाठी आमदारांनी आंदोलन करून मार्ग खुला करायला भाग पाडले. एकीकडे शहरात येण्यासाठी आंदोलन करायचे आणि दुसरीकडे हद्दवाढीत यायला नको, ही आमदारांची दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका राजेश लाटकर, आर. के. पोवार यांनी केली. हद्दवाढी टाळली गेली, तर शहराच्या नाक्यावर प्रवेश कर बसविण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा लाटकर यांनी दिला.
‘टीडीआर’ घेतलेल्यांची नावे जाहीर करा
हद्दवाढीत आल्यावर गावामध्ये क्रीडांगणे, बगीचे उभारू असे महापालिकेकडून सांगितले जात आहे; परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या ताब्यातील सार्वजनिक जागांवर व्यावसायिक संकुले उभारली जात आहेत. त्यांचे काय? असा सवाल आमदार नरके यांनी उपस्थित करून ‘टीडीआर’ घेतलेल्या नगरसेवकांसह इतरांची नावे जाहीर करण्याची मागणी केली.
पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव
ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊनच हद्दवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आमदार नरके यांनी मांडला.
तिन्ही आमदारांच्या अभिनंदनाचा ठराव
हद्दवाढविरोधात आपली आमदारकी पणाला लावून मुख्यमंत्र्यांना अधिसूचना मागे घेण्यास भाग पाडणारे आमदार सर्वश्री. चंद्रदीप नरके, अमल महाडिक व सुजित मिणचेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी मांडला.
बैठक घेण्यासाठी
प्रयत्नशील : क्षीरसागर
शहराची हद्दवाढ आवश्यक असताना तिला विरोध करणे म्हणजे शहराच्या तसेच जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्यासारखे आहे. म्हणूनच ग्रामीण जनतेने विरोध करू नये.
शहरी आणि ग्रामीण असा वाद तसेच राजकीय वाद निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. सरकारने नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीने हद्दवाढ आवश्यक असल्याचा अहवाल दिला आहे.
त्यामुळे आता चर्चा करीत बसण्यापेक्षा हद्दवाढ केल्याचे जाहीर करून टाका, असे आवाहनही त्यांनी केले. आपण मुंबईत मंगळवारी (दि. १६) मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून बैठक घ्यायला भाग पाडू, असे सांगून हद्दवाढीचा निर्णय आता टाळला गेला, तर कोल्हापुरात एक मोठा लढा उभारला जाईल, असा इशाराच आमदार क्षीरसागर यांनी दिला.
१८ गावे, दोन एमआयडीसीसह हद्दवाढ करा
कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रस्तावातील १८ गावे आणि दोन एमआयडीसी शहराच्या हद्दवाढीत आल्याच पाहिजेत, असा आग्रह धरला.
उगीच दोन-पाच गावे देऊन बोळवण करू नये. मुख्यमंत्री सकारात्मक आहेत; परंतु कोणीतरी विरोध करतंय म्हणून निर्णय लांबविणे योग्य नाही, असे सांगत विरोध करणाऱ्या आमदारांना शहरात प्रवेश बंद, पुतळ्याचे दहन अशा स्वरूपाची आंदोलने छेडली जातील, असा इशारा पोवार यांनी दिला.
हद्दवाढीसंदर्भात कोणत्याही व्यासपीठावर समोरासमोर येऊन चर्चा करण्याची आमची तयारी आहे. ग्रामीण जनतेच्या मनातील सर्व शंका दूर केल्या जातील. ग्रामीण भागातील आमदार जनतेची दिशाभूल करीत आहेत. परवा त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल केली.
मुख्यमंत्र्यांनी आता अधिक वेळ न घेता लवकरच निर्णय घ्यावा, असे भाजपचे महेश जाधव यांनी सांगितले. यावेळी राजेश लाटकर, लालासाहेब गायकवाड, विक्रम जरग, पंडितराव सडोलीकर, बाबूराव कदम, महापालिका सभागृह नेता प्रवीण केसरकर, आदींनी आपली भूमिका मांडली.