आजरा-विकास आघाडीने उचलला सत्तांतराचा विडा
By admin | Published: May 20, 2015 09:33 PM2015-05-20T21:33:06+5:302015-05-21T00:09:37+5:30
कार्यकर्त्यांचा मेळावा : आजरा तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूक
आजरा : आजरा तालुका खरेदी-विक्री संघाच्या कारभारावर प्रचंड टीका करीत बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली व गोकुळचे संचालक रवींद्र आपटे आजरा कारखाना अध्यक्ष विष्णूपंत केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आजरा येथे पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आजरा विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी तालुका संघाच्या निवडणुकीत सत्तांतराचा निर्धार व्यक्त केला.
आजरा महाविद्यालयाच्या सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. स्वागत आजरा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास नाईक यांनी केले.
आजरा कारखान्याचे अध्यक्ष विष्णूपंत केसरकर म्हणाले, तालुका खरेदी-विक्री संघाचा कारभार स्व. राजारामबापू देसाई यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने कसा चालविला आहे हे सर्वश्रृत आहे. तालुका खरेदी-विक्री संघ आजरा तालुक्याचे वैभव समजले जाते. भविष्यात संघाला चांगले दिवस येण्यासाठी सक्षम व्यक्तींच्या हातात संघाची सत्ता राहिली पाहिजे. गेल्या दहा वर्षांत दोन ते अडीच लाखांच्या पुढे संघाचा कधी नफा गेला नाही. दहावी-बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सभासदांना वर्षातून एकदा लाडू चिवडा असाच काहीसा प्रकार सुरू आहे. सभासदांना परिवर्तन हवे आहे आणि जिल्हा बँक निवडणूक निकालाची पुनरावृत्ती संघात झाल्याशिवाय राहणार नाही, असेही केसरकर यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे संचालक चराटी म्हणाले, ३५ कोटींची उलाढाल असलेल्या संघात नफा अत्यल्प होतो. यामागचे गौडबंगाल काय ? संघाच्या कारभाराबाबत योग्य वेळ येताच बोलू. मात्र, संघात सत्तांतर होणार हे स्पष्ट आहे, असा विश्वास केला.
‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे म्हणाले, सक्षम पॅनेल तयार करून आपण निवडणुकीला सामोरे जावू. एकोप्याने काम केल्यास घवघवीत यश मिळेल, असेही स्पष्ट केले.
संभाजी तांबेकर, नामदेव नार्वेकर, सदानंद व्हनबट्टे, मारूती घोरपडे, महादेव पाटील, डॉ. इंद्रजीत देसाई, गंगाधर पाटील, एन. डी. केसरकर, गंगाधर पाटील, दिगंबर देसाई, प्रा. सुनील शिंत्रे, जि.प.चे माजी अध्यक्ष उमेश आपटे, प्रकाश वाटवे यांची भाषणे झाली. अजित चराटी, काशिनाथ तेली, महादेव पाटील, दत्तू कोकितकर, बयाजी मिसाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, राजू होलम, बी. टी. जाधव, गोविंद सावंत, राजू जाधव, डॉ. अनिल फर्नांडिस यांच्यासह सेवा संस्थांचे ठरावधारक उपस्थित होते. (प्रतिनिधी)