पहिलीच्या प्रवेशाच्या वय निश्चितीने ताण कमी होणार
By Admin | Published: October 28, 2014 12:30 AM2014-10-28T00:30:34+5:302014-10-29T00:13:00+5:30
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त : पालकांच्या अनावश्यक घाईला लगाम
कोल्हापूर : शिक्षण खात्याने शाळा प्रवेशाबाबतच्या राज्यातील समान धोरणांतर्गत पहिली प्रवेशाचे वय ५ वर्षे ११ महिने निश्चित केले आहे. या निर्णयाला मूर्त स्वरूप मिळाल्यास ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून पालकांना असलेल्या अनावश्यक घाईला लगाम बसणार आहे.सध्या वयाची ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच पहिलीच्या प्रवेशाचा नैसर्गिक नियम आहे. वाढत्या स्पर्धेमुळे मानसिकदृष्ट्या शिक्षणासाठी मुले, मुली सक्षम होण्यापूर्वीच इयत्ता पहिलीमध्ये त्यांना प्रवेशित करण्याची पालकांची घाई सुरू असते. ते टाळण्यासह शाळा प्रवेशाच्या समान धोरणांतर्गत पहिलीच्या प्रवेशासाठी वय ५ वर्षे ११ महिने असे शिक्षण खात्याने निश्चित केले आहे. वय निश्चितीच्या निर्णयामुळे शिक्षणासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर मुले-मुली पहिलीमध्ये प्रवेशित होतील. शिवाय त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण आत्मसात करता येईल. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (प्रतिनिधी)
सूचना नाहीत...
पहिलीच्या प्रवेशाच्या वय निश्चितीचा प्राथमिक निर्णय झाल्याचे समजते. मात्र, त्याबाबत अजून कोणत्याही लेखी सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. पण, असा निर्णय लागू झाल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या चांगला ‘पिकअप’ घेता येणार आहे.
- एस. ए. गिरी (प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण डळ, महानगरपालिका)