एजन्सी नेमून पंचगंगा प्रदूषण नियंत्रणाचा कृती आराखडा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:42+5:302021-05-06T04:25:42+5:30
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण नियंत्रण आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने एजन्सी नेमावी आणि त्यांच्या माध्यमातून अंदाजित रकमेसह ...
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण नियंत्रण आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने एजन्सी नेमावी आणि त्यांच्या माध्यमातून अंदाजित रकमेसह तो आराखडा तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण सूक्ष्म कृती आराखड्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आराखड्यात समावेश केला जावा. इचलकरंजीसाठी झेडएलडीचा प्रकल्प, संबंधित नगर परिषद, गावे यांची गरज लक्षात घेऊन आराखड्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत समावेश असावा.
खासदार माने म्हणाले, इचलकरंजी येथील झेडएलडी प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्याचा सहभाग असणारी योजना असावी. त्याचबरोबर कोणते तंत्रज्ञान वापरणार याचा समावेश असावा. एकूणच महसूल निर्माण करण्याचं मॉडेल या आराखड्याच्या माध्यमातून तयार करावे.
आमदार आवाडे यांनी इचलकरंजीतील नवीन प्रक्रिया प्रकल्प व नागरी विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढावा, असे मत मांडले. आमदार जाधव यांनी एसटीपी प्रकल्पाचा दर्जा व ऋतुराज पाटील यांनी क्रस्टर मंजूर असलेल्या पण यात कमी पडत असलेल्या ग्रामपंचायतींकडे लक्ष देऊन प्रकल्प पूर्ण करावा, असे सांगितले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले की, संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्याबाबत सुचवावे, म्हणजे आराखड्यात त्याचा समावेश करता येईल. सर्वांच्या सूचनांचा समावेश करून अंदाजित रकमेसह हा आराखडा पूर्ण करण्यात येईल.
समिती सदस्य उदय गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे उपस्थित होत्या.
--
फोटो नं ०५०५२०२१-कोल-पंचगंगा बैठक
ओळ : जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण सूक्ष्म कृती आराखड्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
--