सर्वच पक्षांचा अजेंडा, रायगड कॉलनीवर आमचाच झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:26+5:302021-01-03T04:24:26+5:30

डझनभर इच्छुक, नेत्यांचा लागणार कस ज्योती पाटील, पाचगाव : शहरापासून जवळच असणारा प्रभाग क्रमांक ७८, रायगड कॉलनी-जरगनगर हा ...

Agenda of all parties, our flag on Raigad Colony | सर्वच पक्षांचा अजेंडा, रायगड कॉलनीवर आमचाच झेंडा

सर्वच पक्षांचा अजेंडा, रायगड कॉलनीवर आमचाच झेंडा

Next

डझनभर इच्छुक, नेत्यांचा लागणार कस

ज्योती पाटील, पाचगाव : शहरापासून जवळच असणारा प्रभाग क्रमांक ७८, रायगड कॉलनी-जरगनगर हा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने या प्रभागावर आपलाच झेंडा फडकविण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक जाहीर होण्याआधीच या प्रभागावर उमेदवारी करण्यासाठी अनेक मातब्बर इच्छुकांच्या उड्या पडत आहेत. या इच्छुकांनी आतापासून उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात कशी पडेल यासाठी नेत्यांकडे मनधरणी सुरू केली आहे. शेजारील रामानंदनगर- जरगनगर हा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्या प्रभागातील इच्छुकांनीही प्रभाग क्रमांक ७८ ची वाट धरली आहे. २०१५ पूर्वी हे दोन्ही प्रभाग एकच होते. २०१५ नंतर रायगड कॉलनी प्रभाग क्र. ७८ उदयास आला. गत निवडणुकीत हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित होता. त्यावेळी भाजपच्या गीता गुरव व काँग्रेसच्या वैभवी जरग यांच्यात प्रमुख लढत होऊन यामध्ये गीता गुरव यांनी २६ मतांनी निसटता विजय मिळवला होता. सध्या हा प्रभाग सर्वसाधारण झाल्याने याठिकाणी काँग्रेसकडून संतोष जरग, अमर रामाणे, प्रशांत जरग, वैभवी जरग हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून रामानंदनगर-जरगनगर प्रभागातील विद्यमान नगरसेवक सुनील पाटील, रामेश्वर पत्की यांनी फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून प्रशांत पवार, युवराज माने, संदीप पाटील, अमित गुरव यांनीही तयारी सुरू केली आहे. आपमधून लखन काझी इच्छुक आहेत. अमोल बावडेकर, निवास भोसले, भारत तोडकर या इच्छुकांनीही प्रभाग पिंजून काढला आहे.

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते : गीता गुरव : (भाजप) ११७३

वैभवी जरग : (काँग्रेस) ११४७

नंदा गवळी : (राष्ट्रवादी) ६०७, रूपाली बावडेकर : (अपक्ष) १४७

प्रभाग क्र ७८, रायगड कॉलनी-जरगनगर,

आताचे आरक्षण : सर्वसाधारण,

विद्यमान नगरसेविका : गीता गुरव

कोट: गेल्या पाच वर्षांत प्रभागात अनेक विकासकामे केली असून, भागातील अनेक समस्या सोडवल्या आहेत. हा प्रभाग नवीन असल्याने अनेक समस्या होत्या. रस्ते, गटर्स, हॉल, बगीचा, आदी कामे मार्गी लावली असून, यापुढेही संधी मिळाल्यास प्रलंबित प्रश्न मार्गी लावू.

- गीता गुरव, विद्यमान नगरसेविका

सोडविलेले प्रश्न

: अनेक रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत. प्रभागातील काही गटर्स, पाण्याच्या पाईपलाईन, ओपन जिम, बगीचा, एलईडी लाईट यांची कामे केली आहेत.

प्रभागातील समस्या

: प्रभागात अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते व नागरिकांना आजाराचा सामना करावा लागतो. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी वेळेवर मिळत नाही.

वेळेत स्वच्छता होत नसल्याने कचरा रस्त्यावर विखुरला जातो.

रायगड कॉलनी मुख्य रस्त्याला बाजूपट्ट्या नसल्याने वाहतूक कोंडी होते.

भाजी मंडई नसल्याने भाजीविक्रेते रस्त्यावरच इतरत्र बसलेले असतात. बगीचा असून, देखभाल दुरुस्तीअभावी पडून आहे. ओढ्याला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळ्यात पूर आला की अनेक नागरिकांच्या घरांत पाणी घुसते.

फोटो ०२ प्रभाग क्रमांक ७८

ओळ : रायगड कॉलनी मुख्य रस्त्याला लागून नाक्यासमोर ओपन स्पेसवर साकारण्यात आलेल्या ओपन जिम व बगीचा यांची देखभाल दुरुस्ती वेळेत न केल्याने ते वापराअभावी पडून आहे.

Web Title: Agenda of all parties, our flag on Raigad Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.