महामार्गावर वेश्या व्यवसाय चालवणारा एजंट अटकेत; चार पीडित महिलांची सुटका
By उद्धव गोडसे | Published: May 3, 2023 03:52 PM2023-05-03T15:52:36+5:302023-05-03T15:52:46+5:30
यात कोल्हापुरातील एका महिलेचा समावेश आहे. मंगळवारी (दि. २) दुपारी ही कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर : देहविक्री करणा-या परप्रांतीय महिला पुरवून वेश्या व्यवसाय चालवणारा सिद्राम मुरलीधर केरबा (वय ४५, रा. काडापूर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) याला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्या ताब्यातून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. यात कोल्हापुरातील एका महिलेचा समावेश आहे. मंगळवारी (दि. २) दुपारी ही कारवाई करण्यात आली.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले-बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळुरू महामार्गावर काही ठिकाणी एजंटद्वारे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समजले होते. मिळालेल्या माहितीची खात्री करून मंगळवारी दुपारी महामार्गावर पिर बालेसाहेब दर्गा ते सांगली फाट्यादरम्यान सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहक पाठवून संशयित एजंट सिद्राम केरबा याला पोलिसांनी अटक केली. तो देहविक्री करणा-या महिलांना ग्राहकांसोबत पाठवत होता.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चार पीडित महिलांची सुटका करून ११ हजार रुपये जप्त केले. यातील एक महिला कोल्हापूरची, तर उर्वरित तीन महिला झारखंड, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल येथील आहेत. पीडित महिलांना तेजस्विनी वसतिगृहात पाठवण्यात आले. तर अटकेतील सिद्राम केरबा याचा ताबा शिरोली एमआयडीसी पोलिसांकडे देण्यात आला. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार राजेंद्र घारगे, रवींद्र गायकवाड, मीनाक्षी पाटील, आनंदराव पाटील, किशोर सूर्यवंशी, अभिजीत घाटगे, तृप्ती सोरटे, शुभांगी कांबळे आणि किरण पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.