शेतकरी संघाच्या सभेत सत्तारूढ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:49 AM2017-09-02T00:49:32+5:302017-09-02T00:50:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विरोधकांच्या तक्रारीवरून अध्यक्षांसह संचालकांची झालेली अपात्रता, त्यातून न्यायालयाने दिलेला निकाल या सर्व घडामोडींचे शेतकरी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पडसाद उमटले. संघाची नाहक बदनामी केल्याबद्दल सत्तारूढ समर्थकांनी आक्रमक भूमिका मांडत तक्रारदार सुरेश देसाई यांच्या ‘सभासदत्व रद्द’चा ठराव मांडला.
शेतकरी सहकारी संघाची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी शाहू स्मारक भवन येथे झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील होते. दोन वर्षांत पारदर्शक कारभार केल्याने संघ कोट्यवधीच्या नफ्यात आला. त्यातून कर्मचाºयांची प्रलंबित देणी देऊन १२ टक्के लाभांश दिल्याचे सांगत अध्यक्ष युवराज पाटील म्हणाले, मध्यंतरी काही मंडळींनी विनाकारण टीकाटिपणी करून चांगल्या चाललेल्या संघाची बदनामी केली. ज्यांनी संघाला नुकसानीत लोटले तेच टीका करीत असल्याने वाईट वाटते; पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालू आर्थिक वर्षात संघाचा नफा दोन कोटी करण्याचा मानस आहे.
जयसिंग हिर्डेकर म्हणाले, काही विघ्नसंतोषी मंडळींनी बदनामी केली. त्यांचा निषेध करावा. सुरेश देसाई यांनी नाहक बदनामी केली असून, त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव नंदकुमार पाटील (बिद्री) यांनी मांडला. त्यास मारुती पाटील (नणुंद्रे) यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकरांनी देसाई यांच्यासह विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.
रायबाग साखर कारखान्याबाबत उच्च न्यायालय व विमा हप्त्यांत दावे सुरू असल्याने संघाची मोठी रक्कम खर्ची पडते, यासाठी हे दावे मागे घेण्याचा ठराव आकाराम पाटील यांनी मांडला. यावर तत्कालीन संचालक मंडळांकडून रक्कम वसूल करण्याची मागणी जयसिंग हिर्डेकर यांनी केली. विम्याबाबतचा दावा मागे घेण्याचा निर्णय झाला. नामदेव चांदणे, सूर्यकांत पाटील, संभाजीराव भोसले, आदींनी चर्चेत भाग घेतला. संघाच्या अडत दुकानात सर्वाधिक गूळ पुरवठा करण्याकामी मोहन पाटील, शिवाजी पाटील, अविनाश चौगुले यांचा; तर खतांची चांगली विक्री केल्याबद्दल व्यवस्थापकांचा सत्कार रोख बक्षीस देऊन करण्यात आला. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले. यावेळी अण्णासाहेब चौगुले, मानसिंगराव जाधव, यशवंत पाटील, अमरसिंह माने, जी. डी. पाटील, एम. एम. पाटील, शशिकांत पाटील, विजयकुमार चौगुले, विनोद पाटील, बाळकृष्ण भोपळे, व्यंकाप्पा भोसले, सुमित्रादेवी शिंदे, शोभना शिंदे, विजयादेवी राणे उपस्थित होते. व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांनी अहवाल वाचन केले. एका मिनिटात विषयपत्रिकेवरील विषयांना सभेने मंजुरी दिली.
अध्यक्षांसाठी ‘फॉर्च्युनर’ अन् अभिनंदन!
संघाचे अध्यक्ष गाडीत बसले की दिसत नाहीत; त्यामुळे नवीन घेतलेली ‘इनोव्हा’ बदलून ‘फॉर्च्युनर’ गाडी घ्या, असा ठराव उपस्थितांनी केला. संचालकांच्या अभिनंदनाचा ठराव करीत पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील पंचायत समितीचे सदस्य मोहन पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पैसे गावाचे अन् उड्या
पाडळी गावच्या वतीने आकाराम पाटील यांनी संचालकांचा सत्कार केल्याचा उल्लेख करीत बाबासाहेब पाटील म्हणाले, सत्काराचे पैसे गावातील लोकांकडून गोळा करणार आणि आकाराम सत्कार करणार. गावाच्या पैशांवर आकारामाच्या उड्या सुरू असतील, तर त्याची चौकशी करायला हवी.
या झाल्या मागण्या
जुन्या सभासदांकडून ५०१ रुपये शेअर्स वर्गणी भरून घ्या.
पूर्वीप्रमाणे दिवाळीला भेट द्या.
खतविक्रीतून सर्वाधिक नफा मिळत असल्याने त्याकडे लक्ष केंद्रित करा.
साखर, रॉकेल विक्रीशिवाय इतर व्यवसायांत उतरा.