Kolhapur: गुप्तधन अमिषापोटी नरबळी देण्याचा अघोरी प्रकार, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:48 PM2024-07-03T12:48:57+5:302024-07-03T12:49:18+5:30
सहा संशयित आरोपींना अटक
राजेंद्र पाटील
भोगावती : कौलव (ता.राधानगरी) येथे गुप्तधन अमिषापोटी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कौलचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड होऊन सहा संशयित आरोपींना काल, मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागणारी अशी ही घटना आहे.
घटनास्थळावरून आणि राधानगरीपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौलव येथील शरद धर्मा कांबळे या युवकाने घरात असलेल्या गुप्तधनप्राप्तीसाठी काही अघोरी प्रकार सुरू केला होता. त्याच्या राहत्या घरी देवाऱ्याच्या समोर तीन ते चार फुटाचा खड्डा काढून विधिवत पूजा केली जात असल्याचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी शरद धर्मा माने (रा कौलव), महेश सदाशिव माने (रा. राजमाची ता. कराड जि. सातारा), अशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ ( दोघे रा मंगळवार पेठ कराड जि. सातारा), संतोष निवृत्ती लोहार (रा. वाझोली ता. पाटण जि. सातारा), कृष्णात बापु पाटील (रा. पुलाची शिरोली ता. हातकणगले) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
सरपंच कुंभार आणि माजी उपसरपंच व फिर्यादी अजित पाटील यांना सांगितले की, गेले काही दिवसापासून या घरात काही धार्मिक विधी केले जात होते. याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर या घरात थेट प्रवेश केला. त्यावेळी एका चटईवर केळीचे पानावरती हळद-कुंकु सुपारी, नारळ पानाचे विडे, लिंबु त्याला टाचण्या मारलेल्या अशी पुजा करत असलेचे दिसले. त्यातील संशयित आरोपी चंद्रकांत धुमाळ हा काही मंत्रोउच्चार करत होता. त्याचे गळ्यामध्ये रुद्राक्ष व वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या होत्या. त्याच्याशेजारी संशयित आरोपी शरद माने बसलेला होता.
आतील खोलीत गेले असता तेथे देव घराचे समोर अंदाजे तीन ते चार फुटाचा खड्डा काढला होता. फिर्यादी पाटील यांनी आरोपींना याबाबत विचारले असता संशयित आरोपी संतोष लोहार याने या खड्ड्यामध्ये गुप्तधन मिळणार आहे त्यासाठी ही पुजा करत आहोत असे सांगितले. तेथील संशयित आरोपी आशिष चव्हाण याने येथुन निघुन जावा अन्यथा तुम्हाला ठार मारीन अशी धमकी दिली. ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच अजित पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.