दागिन्यांसाठी केला वृद्धेचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:26 AM2021-02-11T04:26:56+5:302021-02-11T04:26:56+5:30
कोल्हापूर : संशयित आरोपी संतोष परीट याला दुकानगाळा घेण्यासाठी पैसे हवे होते, त्यासाठी तो शांताबाई आगळे यांच्याकडे पैसे मागत ...
कोल्हापूर : संशयित आरोपी संतोष परीट याला दुकानगाळा घेण्यासाठी पैसे हवे होते, त्यासाठी तो शांताबाई आगळे यांच्याकडे पैसे मागत होता; पण त्या देत नव्हत्या. त्यामुळे त्याने त्यांच्या अंगावरील दहा तोळे दागिन्यांसाठी अखेर घात केला.
महावीर महाविद्यालयानजीक मृत आगळे यांची शर्मिला साळोखे ही मुलगी राहते. संशयित परीट हा परीट असल्याने इस्त्रीची कपडे देण्यासाठी साळोखे यांच्या घरी येत होता. त्यातूनच त्यांची आई आगळेशी परीटची ओळख झाली. आगळे या काही महिन्यांपूर्वी खरी कॉर्नर येथील घर विकून पाचगाव येथे भाड्याने एकट्याच राहत होत्या. घर विकलेल्या पैशातून त्यांनी दहा तोळे सोन्याचे दागिने केले होते. संशयित परीट हा वारंवार पाचगाव येथे जाऊन त्यांच्याकडे पैसे मागत होता. शुक्रवारी तो देवकार्याच्या निमित्ताने त्यांना मोपेडवरून घेऊन गेला. त्यानंतर त्या बेपत्ताचा होत्या. मृतदेहाच्या अंगावरील साडी व सोबतच्या पर्सवरून मुलींनी त्यांना ओळखले. मृतदेहाच्या अवशेषांपैकी शिराचा भाग मोकाट जनावरांनी खाऊन फक्त कवटीच राहिली होती. कमरेखालील भागही कुरतडल्याचे आढळले.
दागिन्यांवर फक्त तेरा हजारांची उचल
संशयिता खून टाकाळा येथील घरीच केल्याचे पोलिसांनी सांगितले. वृद्धेच्या अंगावरील दहा तोळे दागिने एका बॅंकेत तारण ठेवले, त्यावर १३ हजार रुपये उचलल्याची माहिती पोलिसांना मिळाली; पण दागिन्यांवर फक्त तेरा हजार रुपये मिळाले, या संशयामुळे या गुन्ह्यात आणखी सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
पोलिसांसह राखीव दल मदतीला
अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरीचे निरीक्षक सीताराम डुबल, सहायक पोलीस निरीक्षक समाधान घुगे, सत्यराज घुगे, विवेकानंद राळेभात यांच्यासह पोलीस, राखीव दलाच्या पोलिसांनी अवशेष शोधासाठी परिसर पिंजून काढला.
संशयितास घटनास्थळी फिरविले, घराची झडती
संशयिताचे बिंदू चौकात कपडे इस्त्रीचे दुकान आहे, तसेच टाकाळा परिसरातील पत्नी व दोन लहान मुलांसह राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये तो वॉचमनचेही काम करत होता. त्याला अटकेनंतर पोलिसांनी घटनास्थळी फिरविले.
फोटो नं.१००२२०२१-कोल-खून०५
ओळ : वृद्धेच्या निघृण हत्येप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी संशयित आरोपी संतोष परीट याला अटक केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)