शैक्षणिक व्यासपीठाचे आज उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:29+5:302021-02-23T04:35:29+5:30
कोल्हापूर : शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या गलथान कारभाराच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आज, सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. ...
कोल्हापूर : शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या गलथान कारभाराच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आज, सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक संघात जिल्ह्यातील संस्थाचालकांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते.
मुंबई येथील आझाद मैदानावर प्रचलित नियमानुसार अनुदान मागणी साठी आंदोलन सुरू असून, शासनाने कारण नसताना तपासणीचा घाट घातला. या दरम्यान शासनाने तपासणी करून अनुदान पात्रतेसाठी याद्या जाहीर केल्या; परंतु कोल्हापूर विभागाची तपासणी मंत्रालयातील संबंधित अधिकारी यांनी केली. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शासनास अहवाल वेळेत सादर केला नाही. त्यामुळे १०९ ज्युनिअर काॅलेजमधील शेकडो शिक्षक वेतनापासून वंचित राहण्याचा धोका आहे. ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे त्यांची चौकशी होऊन शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि सदर १०९ ज्यु. काॅलेजना अनुदान द्यावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे वतीने आज, सकाळी ११ वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या समोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी वसंतराव देशमुख, खंडेराव जगदाळे, इरफान अन्सारी, आर. वाय. पाटील, डी. एस. घुगरे, पी. एस. हेरवाडे, एस. एस. चव्हाण, संदीप पाटील, सुधाकर सावंत, बी. डी. पाटील, आदी उपस्थित होते.