कर्मवीर अण्णांच्या गावातच शाळेच्या विकासासाठी आत्मक्लेष आंदोलन
By विश्वास पाटील | Published: August 15, 2023 04:11 PM2023-08-15T16:11:33+5:302023-08-15T16:15:11+5:30
...बेजबाबदार मुर्दाड राज्यकर्त्यांच्यामुळे निर्माण झालेली ही घटना कुंभोज ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत क्लेषदायक असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : स्वत:च्या पत्नीच्या मंगळसुत्रासह जे काहीं होतं ते विकल व जे काम सरकारला करणे शक्य नव्हत ते कर्मवीर अण्णांनी केल. मात्र सरकारने त्यांना आजही उपेक्षितच ठेवल आहे. ज्या कर्मवीर अण्णांनी सामाजिक जीवनातील शिक्षणाचे धडे कुंभोज (ता.हातकणंगले ) येथील प्राथमिक शाळेतून घेतले त्या शाळेचा समावेश महापुरूषांच्या शाळा विकास यादीमध्ये करण्याचे विसरून गेले. वारंवार निवेदने देवूनही याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने या यादीमध्ये या शाळेचा समावेश व्हावा याकरिता आज कुंभोज या गावातील लोक स्वातंत्र्यदिनी कर्मवीर अण्णांच्या स्मारकाजवळ आत्मक्लेश उपोषणास बसले आहेत. बेजबाबदार मुर्दाड राज्यकर्त्यांच्यामुळे निर्माण झालेली ही घटना कुंभोज ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत क्लेषदायक असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, राज्यातील राज्यकर्त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. ज्या अण्णांनी हे वटवृक्ष निर्माण केलं त्या वटवृक्षावर आपला ताबा व वारसा हक्क दाखविण्यासाठी कर्मवीर अण्णांच्या विचाराचा वारसा सांगणा-या या राज्यकर्त्यांनी आपल्याच पै-पाहुणे व नातेवाईकाना त्याठिकाणी विश्वस्त म्हणून बसविले आहेत. ते अशा वेळेस मुग गिळून गप्प का आहेत..? आज कोल्हापूरात ध्वजारोहणासाठी आलेले उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन मंत्री असलेले अजित पवार हे तर रयतच्या उभारणीत काडीचे योगदान नसतानाही ज्या कौशल्याने काकाच्या मदतीने मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य झाले आहेत त्यांनी त्याच कौशल्याने आपली तत्परता या कामात दाखवून कुंभोज ग्रामस्थांना आश्वस्त करून आत्मक्लेश आंदोलनापासून परावृत्त करणे गरजेचे होते.
यामुळे राज्यात शिक्षणाची पाळंमुळं ज्या व्यक्तीने रुजवली, ज्या व्यक्तीने गरीबांच्या शिक्षणाची दारं खुलं केली त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावातील कुमार विद्या मंदिराचा विकास करण्याकडे दुर्लक्ष केल्यास जन आंदोलन उभे करून सरकारला याबाबत निर्णय घेण्यास भाग पाडू असा इशारा शेट्टी यांनी दिला.