कोल्हापूर खंडपीठासाठी आंदोलन तीव्र
By admin | Published: September 12, 2014 11:33 PM2014-09-12T23:33:31+5:302014-09-12T23:36:59+5:30
विवेक घाटगे : कोल्हापूर खंडपीठासाठी वकिलांची मोर्चेबांधणी
सिंधुदुर्गनगरी : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा वकिलांनी कंबर कसली आहे. सहाही जिल्ह्यातील वकिलांची भेट घेऊन कोल्हापूर येथे या सर्वांचा लवकरच मेळावा घेऊन आगामी आंदोलनाचे धोरण निश्चित केले जाणार आहे आणि स्वतंत्र खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचे नियोजन करू, असे प्रतिपादन उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहाही जिल्ह्यातील वकिलांचा संघर्ष सुरू असून, हा संघर्ष अधिक तीव्र करून खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सध्या कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्यावतीने कोल्हापुरातील वकील सहाही जिल्ह्यांचा प्रवास करीत असून, आज हे सर्व वकील सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा वकील संघटना सभागृहात अॅड. राजेंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती अध्यक्ष अॅड. घाटगे बोलत होते. यावेळी सचिव राजेंद्र मंडलिक, कोल्हापूर नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दीपक ठाकूर, अॅड. प्रशांत चिटणीस, अॅड. विनय कदम, अॅड. बाळासाहेब पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना सचिव अॅड. विरेश नाईक, अॅड. व्ही. पी. चिंदरकर, अॅड. राजीव बिले, अॅड. दीपक नेवगी, अॅड. उमेश सावंत, जिल्हा सरकारी वकील अमोल सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी अॅड. विवेक घाटगे म्हणाले की, ५८ दिवसांच्या आंदोलनात सर्वांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंदोलनाला चांगली साथ मिळाली. मुख्य न्यायमूर्तींनी मुख्यमंत्र्यांना या खंडपीठासंदर्भात ठराव घेण्याबाबत कळविले आहे. तरीही जोवर खंडपीठ अस्तित्त्वात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे लागेल.
सभाध्यक्ष अॅड. रावराणे म्हणाले, लोकन्यायालये, कायदाविषयक प्रबोधन शिबिरे आणि न्यायालयांच्या विविध उपक्रमांवर वकिलांनी यापुढे बहिष्कार घालावा लागेल तरच ते आंदोलन आणखीन प्रभावी होईल. हुबळी खंडपीठासाठी तेथील वकिलांनी छेडलेल्या आंदोलनाचे उदाहरण अॅड. प्रशांत चिटणीस यांनी दिले. खंडपीठासाठी सात वेळा पाठविलेला प्रस्ताव तेथील उच्च न्यायालयाने नाकारला. शेवटी आठव्यावेळी मंजूर केला. तोपर्यंत तेथील वकिलांनी चिकाटी सोडली नव्हती.
अॅड. विनय कदम, अॅड. हलगे यांनी एकजुटीने हा लढा लढला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आंदोलन तीव्र करण्यासाठी आमचा सहभाग आहे, असे अॅड. राजीव बिले यांनी सांगितले. अॅड. विरेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कोल्हापुरातून सुमारे ४० वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)