शिवाजी चौक, दसरा चौकातील आंदोलनप्रश्नी १३ जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:01+5:302021-05-06T04:26:01+5:30
कोल्हापूर : जमावबंदी आदेशाचा भंग करून मराठा आरक्षणाबाबत शिवाजी चौक आणि दसरा चौकात राज्य शासनाचा निषेध नोंदविणारे आंदोलन केल्याप्रकरणी ...
कोल्हापूर : जमावबंदी आदेशाचा भंग करून मराठा आरक्षणाबाबत शिवाजी चौक आणि दसरा चौकात राज्य शासनाचा निषेध नोंदविणारे आंदोलन केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत १३ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आदेश लागू केला आहे. त्यामध्ये आंदोलने, जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मराठा आरक्षण रद्द केल्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जाहीर केला. राज्य शासनाने न्यायालयात योग्य भूमिका मांडली नसल्याच्या मुद्द्यावरून राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी प्रसाद जाधव, मनोहर सोरप, प्रकाशन सरनाईक, नंदकुमार घोरपडे, राजेंद्र थोरावडे, उदय लाड, महादेव आयरेकर हे सातजण दुपारी छत्रपती शिवाजी चौकात एकत्र आले होते. जमावबंदी आदेश झुगारून विनापरवाना जमाव करून कोविड नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी या सर्वांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंदविला.
तसेच दिलीप पाटील, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, रूपेश पाटील, भास्कर पाटील आणि रितेश चव्हाण यांनीही दुपारी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर राज्य शासनाचा निषेध केला होता. या सर्वांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला.