आंदोलकाला फटकारले
By Admin | Published: June 16, 2016 12:50 AM2016-06-16T00:50:43+5:302016-06-16T01:02:22+5:30
जिल्हाधिकारी भडकले : इचलकरंजी दारू दुकान प्रश्न ; तीन तास यंत्रणा वेठीस
कोल्हापूर : इचलकरंजी येथील बावणे गल्लीतील दारूचे दुकान बंद करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिलेले आंदोलक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी चांगलेच फटकारले. ‘या गुन्हेगाराला येथे का आणलंत?’ अशी विचारणा त्यांनी ‘उत्पादन शुल्क’च्या अधिकाऱ्यांना केली. ‘तुम्हीच काही ते उत्तर द्या,’ असे सांगून काही मिनिटांतच ही चर्चा संपविली.
अखेर ‘दुधाची तहान ताकावर’ या म्हणीनुसार उत्पादन शुल्कचे अधीक्षक राजेश कावळे यांचे लेखी पत्र स्वीकारत आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाधव यांनी सांगितले; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला ‘गुन्हेगार’ संबोधल्याबद्दल उद्या, गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा जाधव यांनी यावेळी दिला. या आत्मदहन नाट्यामुळे तब्बल तीन तास यंत्रणा वेठीस धरली गेली.
या दुकानासंदर्भात सात दिवसांत कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते; परंतु ती मुदत १० जूनलाच संपली असून या कालावधीत कारवाई न झाल्यास बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा विजय जाधव यांनी दिला होता. त्यानुसार जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत सकाळी ११ च्या सुमारास येथे आले.
त्यांच्यासोबत इचलकरंजी येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एल. एम. शिंदे, उपनिरीक्षक पी. एस. कोरे हेही आले होते. आत्मदहनाच्या इशाऱ्याने यंत्रणा सतर्क झाली होती.
जाधव यांनी यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करू, अशी भूमिका घेतल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची अडचण झाली; कारण जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी हे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होते. त्याला वेळ लागणार असल्याने इतर अधिकाऱ्यांची भेट घालून देतो असे पोलिसांनी सांगितले; तरीही जाधव हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
दुपारी दोनच्या सुमारास त्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट झाली. यावेळी कार्यवाहीबाबत यापूर्वी आंदोलक महिलांना आपण सांगितले असून त्याही सकारात्मक आहेत, असे असताना ‘प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांना वेगळं काय सांगायचं, असे सांगून ज्याच्यावर १८ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, तसेच बाटल्या फोडून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या गुन्हेगाराला तुम्ही या ठिकाणी का आणलं?’ अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे ‘तुम्हीच काही ते उत्तर द्या,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार अधीक्षक कावळे यांनी ‘दुकान बंद करण्याची कार्यवाही जलदगतीने सुरू असून या प्रकरणी जिल्हाधिकारी लवकरच सकारात्मक निर्णय घेतील,’ असे लेखी पत्र बाहेर येऊन आंदोलक विजय जाधव यांना दिले. त्यानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केल्याचे पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)