कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातील तरुणांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 03:36 PM2022-11-22T15:36:02+5:302022-11-22T15:36:19+5:30

उमेदवारांना दिवसा उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळेतच शारीरिक चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले.

Agniveer recruitment process started in Kolhapur | कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातील तरुणांची उपस्थिती

कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातील तरुणांची उपस्थिती

googlenewsNext

कोल्हापूर : सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेला सोमवारी (दि. २१) मध्यरात्रीनंतर राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवले असून, सोमवारी दुपारपासूनच उमेदवारांनी राजाराम कॉलेजच्या मैदानावर गर्दी केली. १३ डिसेंबरपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.

सैन्य दलातील अग्निवीर भरतीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यासह गोवा राज्यातील सुमारे ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर राजाराम कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील उमेदवारांना भरतीसाठी बोलवण्यात आले आहे. उमेदवारांनी सोमवारी दुपारपासूनच राजाराम कॉलेजच्या मैदानात गर्दी केली होती.
कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या कक्षासमोर जागा मिळेल तिथे उमेदवारांनी काही काळ विश्रांती घेतली. मध्यरात्रीनंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.

भरती प्रक्रियेला येणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी मैदानावर पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था केली आहे. तसेच दोन्ही मैदानांवर पुरेसा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाइट आर्मीकडून उमेदवारांसाठी अन्नछत्र राबवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी केवळ १५५३ उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवल्यामुळे भरतीच्या ठिकाणी कुठेही गर्दी किंवा गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही.

अकॅडमींचा पुढाकार

सैन्य भरतीसाठी प्रयत्न करणारे अनेक उमेदवार अकॅडमींमध्ये सराव करतात. अकॅडमींनी स्वत:च्या वाहनांची व्यवस्था करून उमेदवारांना भरतीस्थळी पोहोचवले. त्यामुळे विविध अकॅडमीच्या चालकांचाही वावर भरतीस्थळी पाहायला मिळाला.

रात्रभर चालली भरती प्रक्रिया

उमेदवारांना दिवसा उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळेतच शारीरिक चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रात्रभर भरती प्रक्रिया सुरू राहिली. रनिंगमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना केएमटीच्या बसमधून थेट मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत सोडण्यात आले.

मी पहिल्यांदाच भरतीसाठी आलो असून, प्रक्रियेबद्दल उत्सुकता आहे. चांगली तयारी केली आहे. देशासाठी अग्निवीर बनू, अशी खात्री आहे. -सूरज निवाते, दापोली
 

सैन्य भरतीसाठी मी वर्षभर अकॅडमीत सराव केला. मित्रांसोबत सोमवारी दुपारीच कोल्हापुरात आलो. प्रशासनाने भरतीसाठी चांगली तयारी केलेली दिसते. पूर्ण क्षमतेने भरती प्रक्रियेला सामोरे जाऊ. -आयुष नाईक, सावंतवाडी

Web Title: Agniveer recruitment process started in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.