देशात ४९ लाख टन साखर निर्यातीचे करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:23 AM2021-04-16T04:23:28+5:302021-04-16T04:23:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशात आतापर्यंत ४९ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. ३३ लाख टन साखर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशात आतापर्यंत ४९ लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. ३३ लाख टन साखर निर्यातीसाठी कारखान्यांच्या बाहेर पडली आहे, तर सुमारे २५ लाख टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. अद्याप चालू हंगामातील पाच महिने शिल्लक असल्याने ६० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य सहज पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
निर्यात साखरेपैकी सर्वाधिक ३८.५ टक्के साखर इंडोनेशियाला निर्यात झाली आहे. त्याखालोखाल अफगाणिस्तान १२.३ टक्के, श्रीलंका ९.९ टक्के युनायटेड अरब अमिरात ९ टक्के, सोमालिया ७.६ टक्के तर बांगला देशाला ५.७ टक्के या देशांचा क्रम लागतो. ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशननुसार ३३ लाख ३८ हजार टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली आहे. त्यामध्ये २५ लाख टन प्रत्यक्षात देशाबाहेर गेली आहे, तर ३ लाख टन वाटेत किंवा बंदरात आहे. याशिवाय पाच लाख टन साखर निर्यातीच्या मार्गावर आहे.
चौकट
इंडोनेशियाला प्रथमच सर्वाधिक साखरेची निर्यात
गेल्या वर्षी इराणला भारतातून सर्वाधिक साखरेची निर्यात झाली होती. मात्र, यंदा चलनाच्या मुद्द्यावरून इराणला साखरेची निर्यातच झालेली नाही. त्याऐवजी इंडोनेशियाला यंदा सर्वाधिक म्हणजेच ९ लाख ६१ हजार ५०९ टन साखरेची निर्यात झाली आहे. याचे कारण तेथील रिफायनरींनी भारतीय साखरेसाठी आवश्यक त्या गुणवत्तेचे निकष प्रथमच साध्य केले आहेत.
चौकट
उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर
तब्बल पाच वर्षांनंतर साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे. मार्च अखेरीस महाराष्ट्रात १०० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, तर उत्तर प्रदेशात ते ९६ लाख टन इतके आहे. महाराष्ट्रात यंदा १०५ ते १०७ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे, तर उत्तर प्रदेशात ते १०५ लाख टनांपर्यंत असेल, असा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या चांगल्या पावसामुळे महाराष्ट्रातील ऊस आणि साखरेचे उत्पादन वाढले आहे.