‘गवसे’ संस्थेचे पीक कर्ज ठप्प सचिव नेमणुकीतील राजकारण : सातशे शेतकरी वंचित
By admin | Published: May 11, 2014 12:26 AM2014-05-11T00:26:44+5:302014-05-11T00:26:44+5:30
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील गवसे विकास सेवा संस्थेमध्ये पीक कर्जवाटप ठप्प झाले आहे. गटसचिव नेमणुकीतील राजकारणाचा फटका
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील गवसे विकास सेवा संस्थेमध्ये पीक कर्जवाटप ठप्प झाले आहे. गटसचिव नेमणुकीतील राजकारणाचा फटका येथील शेतकर्यांना बसला असून, सातशे शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत. गेले चार महिने संस्थेच्या सचिव नियुक्तीचा वाद सुरू असल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत; पण त्याबरोबर संस्थेची कर्जवसुलीही ठप्प असल्याने संस्था डबघाईच्या मार्गावर आहे. गवसे पंचक्रोशीतील नावाजलेली विकास संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिले जाते. दोन कोटींची उलाढाल असणार्या संस्थेचे कामकाज सुरुवातीला राजकारणविरहित सुरू होते; पण गावातील अंतर्गत राजकारण थेट संस्थेत घुसल्याने कुरघोड्या वाढत गेल्या. त्यात सचिव किशोर देसाई यांच्या कामकाजाबाबत तक्रारी वाढत गेल्या. सभासदांनी सचिव बदलण्याची मागणी केल्यानंतर एक गटाने त्याला विरोध केला. नवीन सचिव नेमणुकीस स्थगिती देण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे, जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्यापर्यंत पोहोचले. स्थानिक नेतेमंडळींनी सचिवांची नेमणूक प्रतिष्ठेची केल्याने हे प्रकरण चांगलेच ताणले आहे. गटसचिव संघटनेकडून सचिव पाठविला जातो. पण तेथे हजरच करून घेतले जात नसल्याने पेच निर्माण झाला आहे. परिणामी गेल्या चार महिन्यांपासून पीककर्ज वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. या संस्थेची उलाढाल दोन कोटींची आहे. संस्था या गावातील शेतकर्यांचा आधारवड आहे; पण राजकीय कुरघोडीमुळे आधारवड ढासळण्याची भीती शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)