सायकलने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचणारा अवलिया कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जाईल तिथे कामाचा ठसा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:07 PM2022-05-25T12:07:17+5:302022-05-25T12:49:12+5:30
स्वत: काळ्या आईचे लेकरू असल्याने इमान राखत तिलाच कसे वैभव प्राप्त होईल, यासाठी हा अधिकारी कायम जमिनीवर राहून काम करतो. सायकल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतो आणि मातीशी, पिकाशी समरस होऊन जातो.
नसिम सनदी
कोल्हापूर : ‘जिथे जाऊ तिथे खाऊ’ अशी शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता दृढ झाल्याच्या काळात कृषी अधीक्षक असलेले ज्ञानदेव वाकुरे यांच्यासारखा अधिकारी मात्र जिथे जाऊ तिथे स्वतंत्र ठसा उमटवण्यासाठी रात्रंदिवस एक करताना दिसतो. सूक्ष्म नियोजन आणि अचूक माहितीसह प्रश्नांना भिडतो, नुसतीच चर्चा करण्यापेक्षा त्यातून मार्ग काढतो, पर्याय सुचवतो आणि सर्वांचेच मन जिंकतो. स्वत: काळ्या आईचे लेकरू असल्याने इमान राखत तिलाच कसे वैभव प्राप्त होईल, यासाठी हा अधिकारी कायम जमिनीवर राहून काम करतो. सायकल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतो आणि मातीशी, पिकाशी समरस होऊन जातो.
असा हा अवलिया कृषी अधिकारी या महिनाअखेर शासकीय सेवेतून निवृत्त होत आहे, पण त्यांची तडफ पाहून जागतिक बँकेनेच आपल्या प्रकल्पासाठी त्यांना परत बाेलावून घेतले आहे. हवामान अनुकूल कृषी प्रकल्पावर ते येथून पुढे संशोधन अधिकारी म्हणून काम करणार आहेत. कोल्हापुरात त्यांनी ४ वर्षे सेवा बजावली. या काळात दोन वेळा महापूर आला, अतिवृष्टी झाली. नेटाने उभे राहत त्यांनी कृषी पंचनामे सॅटेलाईटद्वारे कमी वेळेत करण्याचे मॉडेल विकसित केले.
या चार वर्षांत कृषी विभागात एकही आंदोलन झाले नाही, की भ्रष्टाचाराच्या सुरस कथा तयार झाल्या नाहीत, हेच त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य. वाकुरे यांच्या कारकिर्दीची सुरुवात चंदगडमधून फलोत्पादन अधिकारी म्हणून झाली व आयुष्यातील विविध टप्पे पार करत २०१८ मध्ये कोल्हापुरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून आले. आता याच पदावरून ते निवृत्त होत आहेत.
हवामान प्रकल्पात कोल्हापूरच्या समावेशासाठी प्रयत्नशील
जागतिक बँकेच्या हवामान प्रकल्पात राज्यातील १५ जिल्ह्यांचा समावेश आहे, कोल्हापूरचाही समावेश व्हावा, यासाठी गेली दोन वर्षे काम केले आहे. समावेश झाला तर कृषी औजारापासून ते अन्य कामांसाठी ६० ते ७५ टक्के अनुदान मिळणार आहे, आता या प्रकल्पावर काम करत असताना प्राधान्याने कोल्हापूरच्या समावेशासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे वाकुरे सांगतात.
उस्मानाबादचे सुपुत्र
वाकुरे हे रामवाडी तेर, जिल्हा उस्मानाबादचे. आई-वडील शेतकरी, दोन भाऊ शेतीच करतात, वाकुरे देखील शेतीच करत होते, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक झाले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना वर्ग दोनची पोस्ट मिळाली आणि कृषी सेवेत दाखल झाले. नोकरी करणारे वाकुरे कुटुंबातील पहिलेच. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या या पोराने नाव काढले.
सॅटेलाईटद्वारे पीक-पाणी मॉडेल
सांगलीत काम करताना दुष्काळ निवारणाबद्दल राज्यपालांच्या हस्ते गौरव झाला. प्रयोगशाळा उपसंचालक म्हणून काम करताना १३ पैकी ११ आयएसओ मानांकित केल्या. उपायुक्त असताना जागतिक पातळीवरची कृषी गणना पूर्ण केली, कोल्हापुरात असताना सॅटेलाईटद्वारे पीक-पाणी मॉडेल विकसित केले.