जिल्ह्यात संथ गतीनेच शेतीचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:19+5:302021-08-12T04:27:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनाम्याचे काम संथ गतीनेच सुरू आहे. पावसाने उघडीप दिली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनाम्याचे काम संथ गतीनेच सुरू आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी अद्याप नदीकाठावर पुराचे पाणी व दलदल असल्याने पंचनाम्यात अडथळा येत असल्याचे संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ २६ टक्केच पंचनामे झाले आहेत.
महापुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे उभी पिके उद्ध्वस्त झालीच त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जमिनी तुटून गेल्या आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना घरांच्या पडझडीच्या पंचनाम्याची जबाबदारी दिली होती. घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून आता शेतीच्या पंचनाम्यांचे काम सुरू झाले आहे. साधारणत: जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसला आहे. त्याच्या पंचनाम्याचे काम सुरू असले तरी ते संथगतीने सुुरू आहे. अद्याप नदीकाठावर पुराचे पाणी व दलदल असल्याने पंचनामा करण्यास अडथळा येत असल्याचे संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे. आतापर्यंत १६ हजार हेक्टरवरील पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्याची माहीती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.