कोल्हापुरात रूजतोय मोबाईलच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणारा ‘कृषी पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:57+5:302021-01-01T04:16:57+5:30

कोल्हापूर: लॉकडाऊनच्या अपरिहार्यतेमुळे का असेना स्वीकाराव्या लागलेल्या ऑनलाईन मार्गदर्शन, प्रशिक्षणाची गोडी आता कृषी अधिकारी, तज्ज्ञांसह शेतकऱ्यांनाही लागली आहे. पैसा, ...

'Agriculture pattern' reaching farmers' dams directly through rooting mobile in Kolhapur | कोल्हापुरात रूजतोय मोबाईलच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणारा ‘कृषी पॅटर्न’

कोल्हापुरात रूजतोय मोबाईलच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणारा ‘कृषी पॅटर्न’

Next

कोल्हापूर: लॉकडाऊनच्या अपरिहार्यतेमुळे का असेना स्वीकाराव्या लागलेल्या ऑनलाईन मार्गदर्शन, प्रशिक्षणाची गोडी आता कृषी अधिकारी, तज्ज्ञांसह शेतकऱ्यांनाही लागली आहे. पैसा, श्रम आणि वेळेची बचत करताना केवळ मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणारा हा ‘कृषी पॅटर्न’ कोल्हापुरात चांगलाच रूळू लागला असून, नव्या वर्षात याची व्याप्ती वाढविली जाणार आहे.

शेती परवडत नाही, नवी पिढी शेतात येत नाही, कृषी अधिकारी नेमके मार्गदर्शन करत नाहीत, कृषी विद्यापीठांचे संशोधन बांधापर्यंत पोहोचत नाही अशी अनेक कारणांची जंत्री वर्षानुवर्षे मांडली जात आहे. पण यावर्षी कोरोनामुळे या जंत्रीलाच छेद देत इतर क्षेत्रांप्रमाणे शेतीचीही नव्याने मांडणी झाली. कृषी विभागाकडून वर्षानुवर्षे एकाच साच्यात होणाऱ्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमातही बदल करावा लागला. त्यातूनच शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांना एकाच धाग्यात गुंफण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय पुढे आला.

कोल्हापुरातील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती)ने यासाठी पुढाकार घेतला. रोगनिदान सल्ला, प्रशिक्षण, यूट्यूबवर लिंक अपलोड करणे अशा तीन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविला जात आहे. पिकांवरील रोगनिदानाचा सल्ला देण्यासाठी १०० शास्त्रज्ञांचा एक व्हाॅट्सअप ग्रुप तयार केला आहे. दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कृषी अधिकारी व शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सुरू झालेली ऑनलाईन प्रशिक्षणाची संख्या वर्ष संपताना तब्बल ४४वर पोहोचली. १९४ कृषी तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ व्हाॅट्सअप ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या २,५४१ शेतकऱ्यांनी घेतला आहे. झूम व गुगल मीटद्वारे मार्गदर्शन केल्यानंतर हा व्हिडिओ ‘यूट्यूब’वर अपलोड केला जात असल्याने शेतकऱ्यांना तो आपल्या सोयीनुसार कधीही बघता येत आहे. आकाशवाणीवरूनही याचे प्रसारण होत असल्याने कृषी विस्ताराचे काम वेगाने होत आहे.

चौकट ०१

खर्चात मोठी बचत

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कृषी विभागाकडे यावर्षी ३५ लाख ८५ हजारांची तरतूद होती. एका प्रशिक्षणार्थीवर दिवसाला दीड हजार खर्च येत होता, परंतु ऑनलाईन प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाल्याने खर्च १० टक्क्यांवर आला आहे. ४० लोकांचे पुण्यात प्रशिक्षण घ्यायचे म्हटले तर ९ लाख रुपये खर्च होत होते, ते आता केवळ ४० हजारांत होत आहे.

प्रतिक्रिया

प्रशिक्षणाचे आयोजन व नियोजन यात बराच वेळ जात असल्याने इतर कामकाजांवर परिणाम होत होता. आता खर्च व वेळही वाचल्याने कृषी विस्ताराच्या नवनवीन संकल्पना राबविणे शक्य झाले असून, हा उपक्रम कायमस्वरूपी राबविला जाणार आहे.

एन. एस. परिट, कृषी अधिकारी, रामेती.

Web Title: 'Agriculture pattern' reaching farmers' dams directly through rooting mobile in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.