कृषी-उद्योग हाच कोल्हापूरच्या विकासाचा पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:02 AM2017-08-12T00:02:54+5:302017-08-12T00:02:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा सध्या चारीही बाजूंनी उभारलेले उद्योग, कृषी आणि त्यांवर आधारित व्यवसायांनी बरकतीला आला असला तरी त्याचा पाया खूप आधीच घातला गेला आहे. १७० वर्षांपूर्वीही उत्पादक क्षेत्रातील उत्पन्न हे सर्वाधिक, तर त्याखालोखाल कृषी क्षेत्रातील उत्पन्न होते. तत्कालीन पोलिटिकल सुपरिंटेंडेंट आॅफ कोल्हापूर मेजर डी. सी. ग्रॅहॅम यांनी तयार केलेल्या सांख्यिकीय अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. ‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आॅफ द प्रिन्सिपलिटी आॅफ कोल्हापूर’ या त्यांच्या अहवालात तत्कालीन कोल्हापूर संस्थानची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
ग्रॅहॅम यांच्या या अहवालाचे सोमवारी (१४ आॅगस्ट) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सिनेट सभागृहामध्ये प्रकाशन करण्यात येणार आहे. शाहू संशोधन केंद्राचे संचालक, प्रख्यात इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. यावेळी शाहू छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे अध्यक्षस्थानी असतील.
सन १८४४ साली ब्रिटिशांचे तत्कालीन राजकीय कारभारी दाजीकृष्ण पंडित (ज्यांच्या काळात गरुड मंडप उभारण्यात आला) त्यांच्याविरोधात
बंड पुकारण्यात आले. करवीर प्रदेशातील सामानगड, विशाळगडचे गडकरीही बंडात सामील होते. मात्र ब्रिटिशांनी ते बंड मोडून काढले आणि त्या ठिकाणी मेजर डी. सी. ग्रॅहॅम यांची ‘पोलिटिकल सुपरिंटेंडेंट’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. याच वेळी ईस्ट इंडिया कंपनीने जिथे-जिथे कंपनीची सत्ता आहे, तेथील प्रदेशातील लोक, त्यांच्या चालीरीती, उद्योग-व्यवसाय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, नद्या, वास्तू, उत्पन्नाची साधने यांचे सविस्तर संकलन करण्याचे आदेश दिले.
‘उत्तम प्रशासनासाठी अशी सविस्तर सांख्यिकीय माहिती अतिशय उपयुक्त ठरते,’ अशी ग्रॅहॅम यांची ही माहिती संकलित करण्यामागील भूमिका होती. यानंतर १८४६ ते १८५४ या कालावधीत ग्रॅहॅम यांनी अतिशय सूक्ष्मपणे माहितीचे संकलन करून हा अहवाल तयार करून पाठवून दिला होता. तोच अहवाल आता पुनर्मुद्रित ग्रंथस्वरूपात वाचकांना उपलब्ध होणार आहे.
या अहवालामध्ये ग्रॅहॅम यांनी कोल्हापूरबाबत काही दिले नाही असे नाही. सर्व प्रकारची इत्थंभूत माहिती या अहवालात आहे. एकीकडे सातारा, दुसरीकडे गोव्यापर्यंत, कोकणात समुद्रापर्यंत आणि बेळगावपर्यंत कोल्हापूर प्रदेश मानला जाई. कोल्हापूर राज्य हे सहा परगण्यांमध्ये विभागले होते. कोल्हापूर, पन्हाळा, भुदरगड, गडहिंग्लज, शिरोळ आणि आळते हे ते सहा परगणे होत. या सहा परगण्यांमध्ये १९ मोठी गावे समाविष्ट होती. त्यांमध्ये विशाळगड, बावडा, कागल, कापशी, इचलकरंजी या गावांचा यात समावेश होता.
२५ लावणी गायिका आणि ५० नर्तिका
मेजर गॅ्रहॅम यांनी ही माहिती संकलित करताना कोणताही घटक वगळला नाही. अगदी लग्न करण्याच्या पद्धतीपासून ते अंत्यसंस्कारांच्या परंपरा आणि बेरड-रामोशांपासून ते अन्य जातव्यवस्थेतील नागरिकांची भाषा अशा सर्वांची माहिती या ग्रंथात दिली आहे.
इतकेच नव्हे तर कोल्हापूर स्टेटमध्ये लावणी गाणाºया २५ गायिका, गायन आणि नृत्य करणाºया ५० महिला आणि लावणी रचणारे २५ कलाकार असल्याची नोंद आहे. हिंदू आणि मुस्लिम महिला लावण्यांचे सादरीकरण करतात. मराठी आणि उर्दू या भाषांमध्ये हे सादरीकरण होते. लावणीवर नृत्य करणाºया महिलांना एका रात्रीच्या कार्यक्रमासाठी १० ते २५ रुपये, तर बैठकीची लावणी सादर करणाºया महिलेला ५ ते १२ रुपये बिदागी दिली जात असे. यातील तबलजीला तीन आणे, तर दोन सारंगीवादकांना प्रत्येकी २ आणे द्यावे लागत होते.
मुख्य भाषा ७
महाराष्ट्री (मराठी), बागवानी हिंदी, कानडी, गुजराती, मारवाडी, तेलगू, द्रविडी अशा सात भाषा प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये त्या काळी बोलल्या जात होत्या.
वर्षातून एकदा महाभोजनाचा कार्यक्रम
पहिले संभाजी यांनी १७२० पासून वर्षातून एकदा भवानी मंडप परिसरात बैरागी, गोसावी, महंत, नागा, भिकारी यांच्यासाठी महाभोजनाच्या उपक्रमाच्या आयोजनाची प्रथा सुरू केली होती. या ग्रंथातील नोंदीनुसार या भोजनाला गोसावी- ४७७६, बैरागी- ११००, भिकारी- १०४४ उपस्थित असल्याची नोंद आहे. या स्वतंत्र भोजनावळी होत असत. यातील महंत आणि नागा साधू यांना ५० रुपयांपर्यंत दक्षिणा, तर भिकाºयांना चार पैसे दिले जात. महंत आणि नागा यांची खुद्द राजे आस्थेने विचारपूस करीत असत.
संचालक, शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
मराठी अनुवाद आवश्यक
हा ५७६ पानांचा ग्रंथ इंग्रजी भाषेतून आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी या संपूर्ण अहवालाचे सार त्यांच्या ५० पानांच्या प्रस्तावनेत मांडले आहे; परंतु राज्यभरातील सर्वसामान्य वाचकांसाठी हा ग्रंथ मराठीमध्ये येणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात किमान डॉ. पवार यांच्या प्रस्तावनेची पुस्तिका तरी मराठीमध्ये अनुवादित केली तरी १७० वर्षांपूर्वीचे कोल्हापूरचे चित्र साकल्याने वाचकांना ज्ञात होईल, यात शंका नाही.
कोल्हापूर नाव कसे पडले?
कोल्हासुर राक्षसाचा वध केला गेला आणि त्यावरून कोल्हापूर नाव पडले. जगप्रलयावेळी देवी अंबाबाईने आपल्या गदेवर (कूर) हे गाव तोलले म्हणून करवीर, कोल्हापूर नाव पडले आणि कमळाला संस्कृतमध्ये कुल्हर म्हणतात. हे तळ्यांचे गाव होते. तळ्यांत मोठ्या प्रमाणावर कमळे होती. या कुल्हरवरू न कोल्हापूर असे नाव पडले असावे, अशा तीन शक्यता वर्तविल्या आहेत.
कोल्हापूर शहराची तत्कालीन लोकसंख्या
ब्राह्मण ७१७०
जैन ११८५
लिंगायत २०३०
मराठे २१,२७८
हिंदू अन्य जाती ८१०५
मुस्लिम ३६१९
मेजर गॅ्रहॅम यांचा हा अहवाल १६३ वर्षांपूर्वीचा आहे. तो दुर्र्मीळ आहे. कोल्हापूरच्या दीड पावणे-दोनशे वर्षांपूर्वीच्या सांख्यिकीय आधारावर मांडलेल्या परिस्थितीचा तो दस्तऐवज आहे. परंतु तो सहज उपलब्ध होत नव्हता. ठिकठिकाणांहून त्याची पाने गोळा करावी लागली. अगदी पुण्या-मुंबईपासून याचे पुनर्मुद्रण करण्याची मागणी होत होती. म्हणून गेली तीन-चार वर्षे परिश्रम घेऊन या ग्रंथाचे संपादन आणि पुनर्मुद्रण करण्यात येत आहे.
- डॉ. जयसिंगराव पवार, संचालक, शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर