‘फादर’नी वीट ठेवली अन् जळीतग्रस्तांची ५ घरे उभारली, बारा वर्षापूर्वीची गडहिंग्लज येथील हृदयस्पर्शी आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 05:47 PM2024-07-26T17:47:58+5:302024-07-26T17:50:20+5:30
फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याहस्ते जळीतग्रस्त घरांच्या पुर्नबांधणीची वीट ठेवण्यात आली अन् गडहिंग्लज तालुक्यातील दगडी शिप्पूर येथील पारळेवाडीतील ५ जळीतग्रस्त अल्पभूधारक शेतकरी कुटूंबांना जगण्याची उमेद आणि हक्काचा निवारा पुन्हा मिळाला.
राम मगदूम
गडहिंग्लज : बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रख्यात ख्रिस्ती धर्मगुरू, लढवय्ये पर्यावरणवादी कार्यकर्ते, संवेदनशील लेखक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याहस्ते जळीतग्रस्त घरांच्या पुर्नबांधणीची वीट ठेवण्यात आली अन् गडहिंग्लज तालुक्यातील दगडी शिप्पूर येथील पारळेवाडीतील ५ जळीतग्रस्त अल्पभूधारक शेतकरी कुटूंबांना जगण्याची उमेद आणि हक्काचा निवारा पुन्हा मिळाला.
हकीकत अशी, डिसेंबर २०१२ मध्ये शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील पारळेवाडीत एक दुर्घटना घडली. दिनकर, तुकाराम, श्रीकांत, सदाशिव व दत्तू या ५ सख्या भावांची दगडामातीची कौलारू घरे एकमेकांना लागून होती.
जनावरांच्या गोठ्यात डासांसाठी घातलेल्या धुमीची आग मध्यरात्री स्वयंपाक घरापर्यंत पोहोचली. त्यामुळे सिलेंडरचा स्फोट होवून पाचही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. छप्पर, दारे, खिडक्या आणि घरातील प्रापंचिक साहित्यासह पैसा-अडकाही जळून खाक झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेती व शेतमजुरीवरच गुजराण करणारी पाचही कुटूंबे उघड्यावर पडली. ‘लोकमत’ने समाजातील दानशूरांना जळीतग्रस्तांच्या मदतीसाठी हाक दिली. त्यामुळे अनेकांनी उत्स्फूर्तपणे रोकड आणि वस्तुरूपाने मदत केली.
दरम्यान, येथील साधना हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फादर दिब्रेटो गडहिंग्लजला आले होते. त्यांच्याहस्तेच पारळेवाडीतील जळालेल्या घरांच्या पुर्नबांधणीची वीट ठेवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. ‘फादर’नीही ती आनंदाने मान्य केली. नियोजित कार्यक्रमानंतर त्यांनी थेट पारळेवाडीला भेट दिली.
त्यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल बन्ने, सुरेश शिपूरकर,उद्योगपती पी.पी.बारदेस्कर,चंदुभाई जोशी, प्राचार्य जे.बी.बारदेस्कर,तत्कालिन प्रांताधिकारी विवेक आगवणे, डीवायएसपी अशोक भरते, तहसिलदार अनिल कारंडे, प्राचार्य तुकाराम चव्हाण, प्राचार्य डॉ .शिवाजीराव रायकर,बचाराम काटे,प्रा.शिवाजीराव होडगे,उज्वला दळवी,सुवर्णलता गोईलकर, अलका भोईटे,प्रा.अनुराधा मगदूम आदी उपस्थित होते.
खुद्द ‘फादर’नीही केली होती मदत..!
जळीतग्रस्तांच्या घरकुल पुर्नबांधणीची वीट ठेवल्यानंतर फादर दिब्रेटो यांनी आपल्या खिशातून काढलेली मूठ एका कार्यकर्त्याच्या हातात सोडली. म्हणाले, 'तुमच्या लाखमोलाच्या कामात माझादेखील खारीचा वाटा. परंतु, त्याबद्दल कुणालाही सांगायचे नाही. आचार-विचारातून मानवता धर्माची शिकवण देणाऱ्या सच्चा ‘धर्मगुरू'च्याहस्ते सुरू झालेले काम अल्पावधीतच पूर्णत्वाला गेले.