वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील वारसांना सव्वा कोटींची मदत, कोल्हापूर जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:34 PM2022-12-31T12:34:14+5:302022-12-31T12:35:36+5:30
वन्य कायद्यातील तरतुदीनुसार या घटनांमधील मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई प्रदान करण्यात आली आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : अभयारण्ये किंवा जंगलाच्या क्षेत्रातील मानव तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत. या प्रकारामुळे कोल्हापूर वनविभागात २०१९ ते २०२२ अखेर या चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. वन्य कायद्यातील तरतुदीनुसार या घटनांमधील मृतांच्या वारसांना आतापर्यंत १ कोटी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई प्रदान करण्यात आली आहे.
काेल्हापूर वनविभागात वर्ष २०१९ मध्ये एकूण चौघांचा मृत्यू झाला, प्रत्येकी १५ लाख याप्रमाणे एकूण ६० लाख, २०२० मध्ये एक, २०२२ मध्ये एकाचा मृत्यू होऊन त्यांना प्रत्येकी १५ लाखांची भरपाई देण्यात आली आहे. अलीकडेच डिसेंबर २०२२ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना २० लाखांची रक्कम कोल्हापूर वनविभागामार्फत दिली आहे. नव्या तरतुदीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात आलेली ही पहिलीच रक्कम आहे.
या तीन वर्षात झालेल्या हल्ल्यांमध्ये गव्यांच्या हल्ल्यातील मृतांची संख्या सर्वाधिक म्हणजे ५ इतकी आहे. आतापर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूला तीन गवे रेडे कारणीभूत आहेत. २०१९ मध्ये या तीन गव्या रेड्यांच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ २०२० मध्ये शिरोळ तालुक्यात नदीकाठावर मगरीच्या हल्ल्यात एकाचा, तर २०२१ मध्ये दानवाडजवळ एकाचा मृत्यू झाला आहे.
२०२१-२२ मध्ये दोन गव्यांच्या हल्ल्यात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये शाहूवाडी तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मुलगी ठार झाली. ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात १, त्यापाठोपाठ रानगवा आणि मगरीच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाली आहे. या हल्ल्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची फारशी माहिती नाही. पण, बहुतांश मृत्यू जंगलालगत असलेल्या गावकऱ्यांचे आणि शेतात काम करणाऱ्या महिला, पुरुषांचे आहेत. शिरोळ तालुक्यातील पाणवठे आणि नद्यांमध्ये असलेल्या मगरींमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे यात दिसते.
या कोल्हापूर प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीतील घटना आहेत. वन्यजीव विभागाची हद्द संरक्षित वनक्षेत्रात येत असल्यामुळे तेथील हल्ल्यात ठार झालेल्यांच्या वारसांना नुकसानभरपाई दिली जात नाही. पूर्वीच्या तुलनेत नुकसानभरपाईच्या मदतीत ५ लाखांनी वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये दिलेली वाढीव रक्कम ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच आहे. - जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक, कोल्हापूर, वनविभाग.
वर्ष | मनुष्य मृत्यू | अनुदान | मृत्यूचे कारण |
२०१९ | ४ | ६० लाख | ३ गवा रेडे, १ मगर |
२०२० | १ | १५ लाख | १ मगर |
२०२१ | १ | १५ लाख | १ गवा |
२०२२ | २ | ३५ लाख | १ गवा, १ बिबट्या |