‘एड्स’ संसर्गीतांना आता ‘एसटी’ मोफत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:33 AM2019-06-25T10:33:23+5:302019-06-25T10:35:12+5:30
दुर्धर आजाराने (एचआयव्ही/एड्स) त्रस्त व्यक्तींना त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालय येथे प्रवास करण्यासाठी प्रती प्रवास ५० किमी १०० टक्के विनामूल्य करण्यास सवलत दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, एन. के. पी. प्लसतर्फे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य व परिवहन महामंडळ यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.
कोल्हापूर : दुर्धर आजाराने (एचआयव्ही/एड्स) त्रस्त व्यक्तींना त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालय येथे प्रवास करण्यासाठी प्रती प्रवास ५० किमी १०० टक्के विनामूल्य करण्यास सवलत दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, एन. के. पी. प्लसतर्फे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य व परिवहन महामंडळ यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.
एच. आय. व्ही. संसर्गीत व्यक्तींना निरोगी आरोग्य टिकविण्याकरिता आयुष्यभर ए. आर. टी. उपचारांची गरज भासते. ही औषधे सरकारी रुग्णालयात मोफत मिळतात. या औषधांकरिता रुग्णास नियमित ए. आर. टी. सेंटरला फेऱ्या माराव्या लागतात. आधीच हलाखीची स्थिती असणाऱ्या रुग्णास प्रवासखर्च झेपत नसल्याने हे उपचार थांबले जातात. परिणामी नियमित औषधे न घेतल्याने मृत्यूचा धोका वाढतो.
कोल्हापूर एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि एन. के. पी. प्लस यांनी एकत्रितरीत्या मोफत एस. टी. बस प्रवासासाठी पाठपुरावा चालू ठेवला होता; पण काही तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गीत लाभार्थी वंचित राहिले होते; त्यामुळे हा विषय जिल्हा एड्स नियंत्रण समितीपुढे मांडण्यात आला.
समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतच्या तांत्रिक अडचणी ताबडतोब सोडविण्याविषयी विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांना सूचना केल्या. त्यानुसार पलंगे यांनी स्वत: लक्ष घालून ही कार्यवाही तातडीने केली.
जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सुरुवातीचे मोफत बस पासचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा एड्स नियंत्रण पथकाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, एन. के. पी. प्लसचे प्रकल्प समन्वयक संजय साऊळ, वैशाली बगाडे, सुनीता पाटील, अनिकेत खाडे, गीता माने, रविराज पाटील, संदीप कोले-पाटील, आदी उपस्थित होते.