केवळ रोजी-रोटीसाठी नव्हे, तर जनसेवक होण्याचे ध्येय ठेवा : कृष्ण प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:36 AM2019-12-16T11:36:27+5:302019-12-16T11:39:01+5:30
सकारात्मक विचाराने जनसेवा, लोककल्याणाचे ध्येय ठरवा. त्यानुसार दृष्टिकोन बाळगा. ध्येय साधण्याबाबत मेहनत करून आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा दिल्यास निश्चितपणे यश मिळेल. केवळ रोजी-रोटीसाठी नव्हे, तर जनतेचा सेवक होण्याचे ध्येय ठेवून केंद्र अथवा राज्याच्या नागरी सेवेमध्ये या, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक व दहाव्या स्पर्धा परीक्षा संमेलनाचे अध्यक्ष कृष्ण प्रकाश यांनी येथे केले.
कोल्हापूर : सकारात्मक विचाराने जनसेवा, लोककल्याणाचे ध्येय ठरवा. त्यानुसार दृष्टिकोन बाळगा. ध्येय साधण्याबाबत मेहनत करून आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा दिल्यास निश्चितपणे यश मिळेल. केवळ रोजी-रोटीसाठी नव्हे, तर जनतेचा सेवक होण्याचे ध्येय ठेवून केंद्र अथवा राज्याच्या नागरी सेवेमध्ये या, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक व दहाव्या स्पर्धा परीक्षा संमेलनाचे अध्यक्ष कृष्ण प्रकाश यांनी येथे केले.
सतेज पाटील फौंडेशन, राजाराम महाविद्यालय, स्टडी सर्कल आणि ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्टतर्फे आयोजित या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहातील या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार सतेज पाटील, तर माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमनार प्रमुख उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारीची प्रेरणा, त्यातील यशासाठी दिशा देण्याच्या दृष्टीने हे साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. खडतर संघर्षातून घडलेल्या अधिकाऱ्यांची माहिती ‘गुगल’वर मिळेल; पण त्यांचे अनुभव या संमेलनातूनच जाणून घेता येतील. नागरी सेवा स्पर्धेत यश मिळवून देशपातळीवर कोल्हापूरचा नावलौकिक करण्याचे काम युवक-युवतींकडून व्हावे.
या कार्यक्रमात सरोज (माई) पाटील, किशोर निंबोरे, कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे चेतन चव्हाण, विजय कुलकर्णी, प्रदीप पाटील, आकाश कोरगांवकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. प्रतिभा विश्वास यांच्या ‘पोलीस नभोमंडलातील नक्षत्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी वैशाली पाटील, राहुल पाटील, आदी उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे प्रवर्तक डॉ. आनंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. समीर देशपांडे यांंनी सूत्रसंचालन केले. ‘ग्लोबल ट्रस्ट’चे संतोष पाटील यांनी आभार मानले.
‘आमचं ठरलंय, महापोर्टल बंद करायचंं’
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापोर्टल एक मोठे संकट आहे. त्यामुळे ‘आमचं ठरलंय, महापोर्टल बंद करायचंं,’ असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. ‘एमपीएससी’मधील संचालकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
नागरी सेवेसाठी तुम्हाला एकदाच पूर्व आणि मुख्य परीक्षा द्यावी लागते. आम्हाला मात्र, दर पाच वर्षांनी मुख्य, तर अधूनमधून जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका अशा पूर्वपरीक्षा द्याव्या लागतात. मुख्य परीक्षेतील यशानंतरचा काळ हा तुमच्यासाठी ‘पर्मनंट’ असतो. त्यामुळे समाजासाठी खूप काही करण्याची संधी असते, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
सहीचा नव्हे, बुद्धीचा पगार
प्रशासकीय सेवकांना केवळ सहीपुरता आणि वरून येणारे निर्णय ऐकण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या बुद्धीसाठीचा पगार मिळतो, असे माजी सनदी अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी सांगितले. ३७० कलम, काळा पैसा, नागरिकत्वाचा कायदा यांची त्यांनी दुसरी बाजू मांडली. वादविवाद आणि विचारांची देवाणघेवाण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत असे निर्णय थोपविलेच जाणार, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चव्हाण-मोदी मॉडेलमधील संघर्ष
कृषी, औद्योगिकीकरणावर भर देणारे विकासाचे मॉडेल तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे, तर सेवा आणि उद्योगक्षेत्राला अग्रक्रम देणारे मॉडेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. या दोन्ही मॉडेलमधील संघर्ष सध्या महाराष्ट्रात सुरू असून, तो समजून घेणे आवश्यक असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.
कृष्ण प्रकाश म्हणाले,
- यशाचे शिखर गाठण्यापूर्वी चांगला माणूस बना.
- स्वत:मधील कमतरता, कमकुवतपणा शोधून, त्यामध्ये सुधारणा करा.
- सर्वप्रथम नागरी सेवेची तत्त्वे, उद्देश समजून घ्या.
- ‘कमिटेड ब्यूरोक्रसी’ पेक्षा लोककल्याणाला महत्त्व देणे आवश्यक