कमी खर्चातील ‘सोलर सेल’ बनविण्याचे ध्येय -- सत्यजित पाटील - संडे स्पेशल मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:26 AM2019-02-24T00:26:40+5:302019-02-24T00:28:40+5:30
विज्ञान शाखेतील विद्यार्थी म्हटले की, संशोधन, अभ्यास इतकेच अनेकदा डोळ्यांसमोर येते. मात्र, त्याला काहीशी बगल देत अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील सत्यजित संजय पाटील याने अभ्यास, संशोधन करीत शिवाजी विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीच्या राष्ट्रपती सुवर्णपदकावर या वर्षी
संतोष मिठारी ।
कोल्हापूर : विज्ञान शाखेतील विद्यार्थी म्हटले की, संशोधन, अभ्यास इतकेच अनेकदा डोळ्यांसमोर येते. मात्र, त्याला काहीशी बगल देत अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील सत्यजित संजय पाटील याने अभ्यास, संशोधन करीत शिवाजी विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीच्या राष्ट्रपती सुवर्णपदकावर या वर्षी नाव कोरले आहे. हे पदक मिळविण्यामागील त्याची प्रेरणा, भविष्यातील संशोधनामधील त्याचे ध्येय, आदींबाबत त्याच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न : राष्ट्रपती सुवर्णपदक मिळविण्याची प्रेरणा कशी मिळाली?
उत्तर : शिवाजी विद्यापीठातील माझे सीनिअर श्रेयस मोहिते, सोनाली बेकनाळकर यांचा दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती सुवर्णपदकाने सन्मान झालेला पाहून हे पदक मिळविण्याबाबतची प्रेरणा मला मिळाली. श्रेयस, सोनाली यांना मी भेटलो. त्यांच्याकडून मी या पदकाबाबतची नियमावली, पात्रता, आदींची माहिती घेतली. गेल्या दोन वर्षांपासून त्यासाठी तयारी सुरू केली. विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागात एम. एस्सी.च्या द्वितीय वर्षातील शिक्षण घेत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे सुरू केले. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), महाराष्ट्र विवेक वाहिनी, आदींच्या माध्यमांतून विविध उपक्रमांत योगदान दिले. जिद्द, सातत्य व आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब केल्याने या पदकावर मला नाव कोरता आले. माझ्या यशात आई-वडील, शाळा ते विद्यापीठापर्यंतचा शिक्षकवर्ग, मित्रांचे पाठबळ, मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले.
प्रश्न : पुढील ध्येय काय आहे?
उत्तर : वडील प्राध्यापक असल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार विज्ञान शाखेमध्ये करिअर करण्याचे ठरविले. विवेकानंद महाविद्यालयात बी. एस्सी. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षापासून विद्यापीठातील प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनात कार्यरत झालो. पदवी घेतल्यानंतर विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागामध्ये एम. एस्सी.करिता प्रवेश घेतला. सोलर सेल (सौरघटक) आणि सुपर कपॅसिटर हे माझ्या अभ्यास आणि संशोधनाचे विषय आहेत. ‘आविष्कार संशोधन महोत्सवा’सह विविध संशोधन परिषद, चर्चासत्रांमध्ये या विषयांच्या अनुषंगाने शोधनिबंध सादर केले आहेत.
इंटरनेट, सोशल मीडियापेक्षा चर्चा करा
करिअरचे क्षेत्र कोणतेही असू दे; त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तरुणाईने जिद्द व कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. पुस्तके, इंटरनेट, सोशल मीडियावर आपल्या विषयांबाबतची माहिती मुबलक प्रमाणात मिळेल. त्याच्या जोरावर परीक्षांमध्ये आपण गुणांची कमाई करून उत्तीर्ण होऊ. मात्र, प्रत्यक्षातील ज्ञान मिळविण्यासाठी शिक्षक, तज्ज्ञ, सिनिअरशी चर्चा करावी. ते निश्चितपणे उपयुक्त ठरणार असल्याचे सत्यजित याने सांगितले.
विद्यापीठाकडून अपेक्षा काय?
विद्यार्थ्यांकडून समाजासाठी उपयुक्त ठरणारे, नवनिर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून संशोधन व्हावे. त्याला महाविद्यालय आणि विद्यापीठाकडून प्रोत्साहन आणि पाठबळ मिळावे. त्या अनुषंगाने विविध योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे. असे झाले तरच संशोधनातील आपला टक्का वाढणार आहे. विद्यापीठाने नुकतीच पदवी पातळीवरील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्याची चांगली योजना जाहीर केली आहे.
सिलिकॉनच्या वापरापासून बनविलेले सोलर परवडणारे नाही. कमी खर्चातील सोलर सेल बनविणे माझे ध्येय आहे. - सत्यजित पाटील