भरतीवर डोळा ठेवून पदांवर निशाणा

By admin | Published: May 17, 2017 01:18 AM2017-05-17T01:18:17+5:302017-05-17T01:18:17+5:30

सांगली जिल्हा बँक : संचालक मंडळातील राजकारणाला वेगळा रंग

Aim for the posts by keeping an eye on recruitment | भरतीवर डोळा ठेवून पदांवर निशाणा

भरतीवर डोळा ठेवून पदांवर निशाणा

Next

अविनाश कोळी ।  लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नोकरभरतीचा ‘अर्थ’पूर्ण निशाणा साधण्यासाठी जिल्हा बँकेच्या काही संचालकांनी पदांवर डोळा ठेवला आहे. गेल्या दोन वर्षात पदांच्याबाबतीत शांत असलेल्या काही संचालकांनी बँकेच्या कारभाराचे वस्त्रहरण करण्यास सुरुवात केल्याने, ही बाब आता स्पष्ट झाली आहे.
जिल्हा बँकेच्या यापूर्वीच्या संचालक मंडळाने केलेल्या कारनाम्यांची नोंद घोटाळ्यांच्या कागदपत्रात कोरली गेली आहे. या घोटाळ्यांच्या चौकशांचे सत्र थांबल्याने सुप्त इच्छांचे वादळ बँकेत घोंगावत आहे. आर्थिकदृष्ट्या स्वच्छ प्रतिमेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची चर्चा दोन वर्षापूर्वी सुरू होती. अस्तित्वात असलेल्या संचालकांपैकी बऱ्याचजणांची नावे घोटाळ्यांच्या रंगात रंगली आहेत. त्यामुळेच यातील अनेकांना बँक कारभाराचा दीर्घ अनुभव असूनही, पदे मिळाली नाहीत. आता काही संचालकांनी भरतीच्या वधूला भुलून पदांच्या स्वप्नांचे बाशिंग गुडघ्याला बांधले आहे.
जिल्हा बँक सध्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मात्र शासकीय व संस्थात्मक अडचणींचे बांध तयार होऊ लागले आहेत. नोटाबंदीचा मोठा फटका बँकेला बसला आहे. राज्य बँकेच्या शाखांच्या माध्यमातून नवे संकट येऊ पाहत आहे. अशा परिस्थितीत बँकेच्या हितासाठी किंवा अडचणींचे बांध तोडण्यासाठी संचालकांची एकी कधीही दिसली नाही. याउलट अडचणींचे बांध दुर्लक्षित करून पदांची स्वार्थी शर्यत सुरू झाली आहे. प्रशासक नियुक्तीपूर्वी अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळात जे राजकारण घडले, तेच पुन्हा घडू पाहत आहे. सत्ताधारी शेतकरी पॅनेलच्या नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. कदाचित त्यांचेही या गोष्टींना बळ असल्याची चर्चा सुरू आहे. बँक पुन्हा बदनाम झाली, तर सत्ताधारी पॅनेल आणि त्यांचे नेतेही तितकेच बदनाम होणार आहेत, याचा विसर नेत्यांना पडला आहे.
संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वसंतदादा कारखान्याच्या निविदा प्रक्रियेवरून काही संचालकांनी अध्यक्षांना धारेवर धरले. त्यानंतर आटपाडीतील एका कारखान्याच्या कारनाम्यांची माहितीही उजेडात आणली. मात्र यापूर्वीच्या संचालक मंडळात बेकायदेशीररित्या झालेले निर्णय त्यांच्याच साक्षीने झाले होते. बँकेतील राजकारणाची लक्षणे ठीक नसल्याने, सत्ताधारी गटाचे नेते आ. जयंत पाटील यांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे.

राजकीय गोेंधळ
गेल्या दोन वर्षात बँकेने सक्षमपणे वाटचाल केली आहे. वसंतदादा कारखान्यासह काही मोठे कारखानदार व संस्थांची थकबाकी या वर्षात वसूल होणे आवश्यक आहे. त्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू असले तरी, राजकीय गोंधळात आर्थिक गोंधळाचा नारळ केव्हाही फुटू शकतो. त्यामुळे राजकीय हालचालींना ‘ब्रेक’ लावणेच आता बँकेच्या हिताचे आहे.

का सुरू आहे राजकारण...
जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मंजुरी मिळाली आहे. साडेचारशे पदांच्या भरतीस मान्यता आहे. तरीही सध्याच्या बँकेच्या आर्थिक बोजाचा विचार केला, तर दोनशेच्या वर कर्मचारी नियुक्त करणे धोक्याचे ठरू शकते. मंजूर झालेली सर्व पदे भरावीत, अशी इच्छा काही संचालकांची आहे. भरतीला ‘अर्थ’पूर्ण इच्छांचे राजकारण जोडले गेल्याने, यात अडथळा येणाऱ्या लोकांना बाजूला करण्याकडे काहींचा कल आहे. यातूनच सत्ताधाऱ्यांमध्येच राजकारण सुरू झाले आहे.

Web Title: Aim for the posts by keeping an eye on recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.