राज्यातील प्राथमिक शाळा आरसीसी करण्याचा मानस: हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 08:33 PM2020-02-02T20:33:12+5:302020-02-02T20:33:19+5:30
राज्यात खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा विविध योजना राबवून प्राथमिक शाळांसमोर आव्हाने उभी करत आहेत.
- दत्ता पाटील
कोल्हापूर (म्हाकवे): राज्यात खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा विविध योजना राबवून प्राथमिक शाळांसमोर आव्हाने उभी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक प्राथमिक शाळांची पडझड झाली असून, दुरवस्था होतेय. त्यामुळे राज्यातील पहिल्यांदा केंद्रीय शाळा त्यानंतर सर्वच प्राथमिक शाळा आरसीसी करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शिक्षकांनीही अंतर्मुख होऊन या शाळा वाचविण्यासाठी शिक्षणाचा दर्जा सुधारावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडूर(ता.कागल)येथील प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
आपण शिक्षणमंत्री असताना सेमी इंग्रजी सुरू केले होते, असे सांगत ना. मुश्रीफ म्हणाले. राज्यात ६५ हजार ३२४ प्राथमिक शाळा असून यामध्ये अडीच लाखांहून अधिक शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. मात्र,अनेक शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. कौले फुटलेली असतात. त्यामुळे या शाळांचा लूक बदलणे गरजेचे आहे. दरम्यान, प्राथमिक शाळा या सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे प्रवेशद्वार आहे. त्या टिकविण्याची जबाबदारी पालक, शिक्षक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकसंधपणे उचलली पाहिजे, असे मतही ना. मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
ग्रामविकास खाते 'पथदर्शी' बनवूः मुश्रीफ
ग्रामविकास मंत्रिपदाच्या काळात दिवगंत आर. आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव ही महत्त्वाकांक्षी अभियानाने राबवून ग्रामविकास खाते गतिमान केले. त्यांच्या आदर्श पायवाटेवरून मार्गक्रमण करून विविध योजनांच्या माध्यमातून हे खाते 'पथदर्शी'बनवू, असा विश्वासही ना. मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.