शिरोळमध्ये आरोग्य यंत्रणेला हवा डोस-: आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी सुविधा आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:40 PM2019-05-08T21:40:41+5:302019-05-08T21:42:27+5:30

शिरोळ तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी शासनाचे म्हणावे तितके नियंत्रण या यंत्रणेवर नाही. त्यामुळेच तालुका आरोग्य कार्यालयाकडून कागदोपत्री अहवाल तयार करण्यापलीकडे काही काम होत नाही असे दिसून येते. एखादे सर्वेक्षण राबवायचे झाल्यास त्यात संवेदनशीलता दिसून येत नाही.

Air Dose to Health System in Shirol- Facilities for Empowerment of Health Systems | शिरोळमध्ये आरोग्य यंत्रणेला हवा डोस-: आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणासाठी सुविधा आवश्यक

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत.

Next
ठळक मुद्देतालुका आरोग्य विभागाबाबत कर्मचाऱ्यांतून नाराजी

संदीप बावचे ।
शिरोळ : शिरोळ तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी शासनाचे म्हणावे तितके नियंत्रण या यंत्रणेवर नाही. त्यामुळेच तालुका आरोग्य कार्यालयाकडून कागदोपत्री अहवाल तयार करण्यापलीकडे काही काम होत नाही असे दिसून येते. एखादे सर्वेक्षण राबवायचे झाल्यास त्यात संवेदनशीलता दिसून येत नाही. तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३३ उपकेंद्रे, दोन ग्रामीण रुग्णालये असा कारभार यंत्रणेचा सुरू असला तरी ही यंत्रणा आणखी सक्षम बनविण्यासाठी आरोग्याच्या आणखी चांगल्या सुविधा पुरविण्याची गरज आहे.

शासनाच्या आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक व उपकेंद्राच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घटकापर्यंत ही यंत्रणा पोहोचत आहे. आरोग्य केंद्रांकडे पुरेसे डॉक्टर्स व कर्मचारीदेखील उपलब्ध आहेत. तालुक्यात शिरोळ, दत्तवाड ही दोन ग्रामीण रुग्णालये, तर नृसिंहवाडी, अब्दुललाट, दानोळी, नांदणी, जयसिंगपूर, घालवाड, टाकळी अशी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. एक जि. प. दवाखाना, दोन आयुर्वेदिक दवाखाने व ३३ उपकेंद्रे, तर उदगाव येथे क्षय रुग्णालय आहे. वैद्यकीय यंत्रणेला मदतीसाठी सुमारे २८० हून अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत असून, त्यांच्यामार्फत अनेक सर्वेक्षणाच्या मोहीम यंत्रणा राबवीत असते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत साठ ते सत्तर रुग्णांची दररोज तपासणी केली जाते.

रुग्णांच्या तक्रारीनंतर आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध होत आहे. तालुका आरोग्य कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे काही आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांकडून आओ जाओ घर तुम्हारा असे चित्र दिसते. नियंत्रण ठेवणाºया यंत्रणेबाबत काही आरोग्य कर्मचाºयांकडून नाराजीचा सूर उमटत असल्याची चर्चा असून, एखाद्या साथीचा फैलाव झाल्यानंतर यंत्रणा जागृत होते, मग उपाययोजना राबविल्या जातात. पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच लोकप्रतिनिधींचा शासकीय आरोग्य यंत्रणेवर अंकुशच राहिलेला नाही.

आणखी ‘१०८’ची गरज
शासनाची अत्यावश्यक सेवा बजावणारी १०८ ही रुग्णवाहिका तालुक्यासाठी सोयीची ठरली असली तरी सध्या तीनच रुग्णवाहिका कार्यरत आहेत. अपघातातील रुग्ण असो वा तातडीची आरोग्य सुविधा, त्यासाठी आणखी दोन रुग्णवाहिकांची गरज आहे. त्या उपलब्ध झाल्यास तत्काळ सेवा देण्यास मदत होणार आहे.
 

जयसिंगपूरला प्रतीक्षाच
पाच वर्षांपूर्वी जयसिंगपूरसाठी ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे. मात्र, जागेच्या तांत्रिक अडचणीमुळे हे रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. वास्तविक, जयसिंगपूरसारख्या शहरातील गरजू रुग्णांना आणखी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी ग्रामीण रुग्णालय गरजेचे आहे.


तालुक्यातील स्थिती
०७ प्राथमिक आरोग्य केंद्रे.
३३ आरोग्य उपकेंद्रे आहेत.
०१ जिल्हा परिषद दवाखाना.
०२ आयुर्वेदिक दवाखाने आहेत.
०७ रुग्णवाहिका आहेत.
१२ एमबीबीएस डॉक्टर आहेत.
०८ परिचारिका आहेत.
२९ आरोग्यसेवक आहेत, मंजूर पदे ३३ आहेत.
३६ आरोग्यसेविका आहेत, मंजूर पदे ४१ आहेत.
१२ आरोग्य सहायक आहेत.
०९ औषध निर्माता आहेत.

 

आरोग्य केंद्रात गेल्यानंतर योग्य ती औषधे उपलब्ध नसतात, असा अनुभव येत आहे. वेळीच औषधे मिळाल्यास त्याचा रुग्णांना उपयोग होणार आहे. रुग्णालयात स्वच्छता असली तरी त्यामध्ये सातत्य दिसून येत नाही.
- मंगल जगताप, यड्राव


नृसिंहवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. दैनंदिन ७५ ते ८० रुग्ण तपासणीसाठी येतात. येथील आरोग्य यंत्रणा सतर्क असून, रुग्णदेखील समाधानी आहेत.
- डॉ. पी. एस. पाखरे
 

Web Title: Air Dose to Health System in Shirol- Facilities for Empowerment of Health Systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.