कोल्हापूर :शहरातील हवा प्रदूषण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 01:01 PM2020-04-14T13:01:38+5:302020-04-14T13:04:07+5:30
या अधिविभागाने करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर परिसर आणि महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि दाभोळकर कॉर्नर ते सीबीएस स्टँड परिसरात दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये हवा प्रदूषणाचे मापन केले. त्याची तुलना दि. १६ ते २२ मार्च दरम्यानच्या मापनासमवेत केली. एप्रिलमधील मापनात एसओटूचे प्रमाण मार्चमधील लॉकडाऊनच्या कालावधीतील सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी झाले आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘जनता कर्फ्यू’नंतर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर शहरातील हवा प्रदूषणाचे मापन शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाने केले. त्यामध्ये हवेतील सल्फर डायआॅक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायआॅक्साईड (एनओटू), सूक्ष्म धूलीकणांचे प्रमाण (आरएसपीएम) कमी झाल्याचे दिसून आले.
या अधिविभागाने करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर परिसर आणि महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि दाभोळकर कॉर्नर ते सीबीएस स्टँड परिसरात दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये हवा प्रदूषणाचे मापन केले. त्याची तुलना दि. १६ ते २२ मार्च दरम्यानच्या मापनासमवेत केली. एप्रिलमधील मापनात एसओटूचे प्रमाण मार्चमधील लॉकडाऊनच्या कालावधीतील सरासरीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. एनओटूचे प्रमाण २५ टक्क्यांनी, तर आरएसपीएमचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. एसओटू, एनओटू आणि आरएसपीएमचे प्रमाण हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनापेक्षा ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, फिल्ड असिस्टंट अजय गौड, अमित माने यांनी प्रदूषण मापनाचे काम केल्याची माहिती पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सोमवारी दिली.
लॉकडाऊनमधील हवेतील प्रदूषकांचे प्रमाण
ठिकाण महिना एसओटू एनओटू आरएसपीएम
दाभोळकर कॉर्नर मार्च
(दि. १६ ते २२) २६.१९ ४५.१५ १२८.४७
एप्रिल
(दि. ६ ते १२) १८.४५ ३०.८२ ७४.६५
महाद्वार रोड मार्च २०.५९ ३७.५१ ९८.९६
एप्रिल १३.६१ २५.५४ ५३.८२
शिवाजी विद्यापीठ मार्च १२.१५ १७.५४ ५७.९९
एप्रिल ७.१३ १२.७२ ४२.३६
मानांकन असे (युजीपरमीटर (मिलिग्रॅममध्ये)
*सल्फर डायआॅक्साईड : ८०
*नायट्रोजन डायआॅक्साईड : ८०
*सूक्ष्म धूलीकण : १००
लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असणे, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक आस्थापना आणि हॉटेल, बेकरी आदींतून बाहेर पडणारा धूर, रस्त्यावर जाळला जाणारा कचरा बंद झाल्याने हवेतील प्रदूषके कमी झाली आहेत.
- डॉ. पी. डी. राऊत