दिवाळीपूर्वी मिळणार विमान उड्डाण परवाना-- धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 11:29 PM2017-10-11T23:29:41+5:302017-10-11T23:31:20+5:30
कोल्हापूर : येथील विमान सेवेसाठीचा परवाना मिळविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : येथील विमान सेवेसाठीचा परवाना मिळविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. हा परवाना दिवाळीपूर्वी मिळविण्यासह कोल्हापुरातून एअर इंडिया कंपनीने सेवा पुरवावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक बुधवारी दिली.
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्याने येथील विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला; पण, विमान उड्डाणाच्या परवान्याचे नूतनीकरण, मुंबईतील टाईम स्लॉट, आदी मुद्दे अडथळा ठरले. हे अडथळे दूर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. याबाबत खासदार महाडिक यांनी सांगितले की, मुंबईतील ‘टाईम स्लॉट’चा प्रश्न पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नांतून मार्गी लागला आहे. विमान उड्डाण परवाना
नूतनीकरणासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) संचालकांकडे पाठपुरावा सुरू आहे. हा परवाना मिळविण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. दिवाळीपूर्वी हा परवाना मिळविला जाईल. ‘उडान’ योजनेअंतर्गत सेवा पुरविण्यासाठी ‘डेक्कन चार्टर एव्हिएशन’ कंपनीला कोल्हापूर मिळाले होते. मात्र, या कंपनीने काही अडचणी मांडल्या आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरमधून ‘एअर इंडिया’ने सेवा पुरवावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत एअर इंडिया प्राथमिक स्वरुपात तयारी दर्शविली आहे. या कंपनीच्या अधिकाºयांनी विमानतळाची पाहणी केल्यानंतर पुढील प्रक्रियेला गती मिळणार आहे.