‘मी ओके म्हणालो अन् काही मिनिटांतच विमान गायब’; कोल्हापुरातील वायुसैनिक मुरलीधर देसाई यांनी जागवल्या आठवणी
By पोपट केशव पवार | Published: October 3, 2024 11:46 AM2024-10-03T11:46:34+5:302024-10-03T11:49:09+5:30
५६ वर्षांपूर्वी घडलेल्या या अपघातात एकही जण वाचला नाही
पोपट पवार
कोल्हापूर : दिवस ७ फेब्रुवारी १९६८... स्थळ चंदीगड विमानतळ..दुपारी १२:५० ला ९८ सैनिक व ५ क्रू मेंबर असलेल्या एका विमानाने लेहला जाण्यासाठी उड्डाण केले. या विमानाला कोल्हापुरातील २६ वर्षांचा एक तरुण वायुसैनिक रेडिओ टेलिफोन ऑपरेटर म्हणून कंट्रोल रूममधून सूचना देत होता. त्याच्या नियंत्रण कक्षापर्यंत हे विमान सुरक्षित मार्गक्रमण करत होते. मात्र, त्या कक्षाबाहेर जाताच काही मिनिटांमध्येच ते कोसळले अन् होत्याचं नव्हतं झालं.
५६ वर्षांपूर्वी घडलेल्या या अपघातात एकही जण वाचला नाही; पण जे गेले त्यातीलही ९८ जण अजूनही सापडले नसल्याने या विमान प्रवासाचा साक्षीदार राहिलेला तो २६ वर्षांचा वायुसैनिक मुरलीधर देसाई आज वयाच्या ८१ व्या वर्षीही या कटू आठवणींनी गहिवरतात. चंदीगड-लेह या विमान अपघातातील चार जणांचे मृतदेह शोधण्यात लष्कराला मंगळवारी यश आले. या पार्श्वभूमीवर देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना पाच दशकांपूर्वीच्या आठवणी जाग्या केल्या.
कोल्हापुरातील मुरलीधर देसाई हे १९६३ मध्ये वायुसेनेत दाखल झाले. पुढे त्यांची चंदीगड येथे रेडिओ टेलिफोन ऑपरेटर म्हणून बदली झाली. चंदीगड-लेह या विमानाच्या पायलटला सूचना देण्याचे काम ते करत होते. ते म्हणाले, त्या दिवशी वायुसेनेच्या विमानातून ९८ सैनिक व ५ क्रू मेंबर लेहला जाण्यासाठी दुपारी १२:५० वाजता निघाले. हे विमान दुपारी १:४० ला लेहला पोहोचणार होते. हे विमान माझ्या नियंत्रण कक्षात होते तोपर्यंत हवामान, विमानाची उंची याबाबत मी पायलटला सूचनाही दिल्या. मात्र, माझ्या नियंत्रण कक्षाच्या बाहेर विमान जाताच मी ओके म्हणालो अन् काही मिनिटांतच ते कोसळले.
बिघाड, अडचणीबाबत काहीच सांगितले नाही
माझ्या नियंत्रण कक्षाबाहेर विमान जाताच लेह विमानतळावरील ऑपरेटर पायलटला सूचना देत होता. त्यांचे संभाषण मी लिहून घेत होतो. मात्र, विमानात काही बिघाड, अडचण याबाबत पायलटने काहीच सांगितले नसल्याचा दावा देसाई यांनी केला. या अपघातातील सर्व सैनिकांचे मृतदेह केंद्र सरकारने शोधून काढणे गरजेचे आहे, असेही देसाई म्हणाले.