विमानसेवेच्या ‘टेकआॅफ’ची आशा पल्लवित

By admin | Published: March 1, 2016 12:14 AM2016-03-01T00:14:18+5:302016-03-01T00:17:35+5:30

केंद्रीय अर्थसंकल्प : बंद विमानतळे वापरात आणण्याच्या निर्णयात कोल्हापूरचा समावेश

The airport hopes for 'takeoff' | विमानसेवेच्या ‘टेकआॅफ’ची आशा पल्लवित

विमानसेवेच्या ‘टेकआॅफ’ची आशा पल्लवित

Next

कोल्हापूर : देशातील अनेक राज्यांमधील वापरात नसलेली विमानतळे वापरात आणण्याचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. यात कोल्हापूरचा समावेश असल्याने गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेल्या विमानसेवेचे टेकआॅफ होण्याची शहरवासीयांची आशा पल्लवित झाली आहे.
अनेक राज्यांमध्ये लहान विमानतळ आहेत. मात्र, काही तांत्रिक आणि पायाभूत स्वरूपातील अडचणींमुळे त्याचा वापर होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका संबंधित राज्याला बसत आहे. ते टाळण्यासह या राज्यातील अशी विमानतळे वापरामध्ये आणण्याचा निर्णय अर्थसंकल्पातून घेण्यात आला आहे. तसेच नव्या २० विमानतळांच्या निर्मितीबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या १६० विमानतळांचा वापर सुरू होणे शक्य आहे. या निर्णयात कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश आहे.
या निर्णयामुळे संबंधित विमानतळाचा विकास होऊन येथून नियमितपणे विमानसेवा सुरू होईल, अशी आशा वाटत आहे. विमानतळ सुरू झाल्यास त्याचा तीर्थक्षेत्र विकास, पर्यटनवाढीला उपयोग होणार आहे. तसेच कोल्हापूरच्या उद्योग वाढीलाही चालना मिळणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मिशनअंतर्गत देशातील ७६ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात झाला आहे. कोल्हापुरात बहुतांश लघुउद्योग आहेत. शिवाय कौशल्यपूर्ण उत्पादन निर्मिती अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे कौशल्य विकास मिशनअंतर्गत येथील युवक-युवतींना प्रशिक्षण मिळण्याची अधिक शक्यता आहे. (प्रतिनिधी)

कोल्हापूरला उपयुक्त ठरणारे निर्णय
दोन कोटी रुपयांच्या आत उलाढाल असलेल्या लघुउद्योगांना कर सवलतीचा निर्णय झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकतर लघुउद्योजक आहेत. त्यामुळे त्यांना संबंधित कर सवलत दिलासा देणारी असल्याची माहिती अर्थतज्ज्ञ व शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय ककडे यांनी दिली. ते म्हणाले, दुग्ध व्यवसायाला चालना देणाऱ्या चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचा येथील दुग्ध व्यवसायाला फायदा होणार आहे.
रस्ते, रेल्वे तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दोन लाख ११ हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यातून कोल्हापूर-वैभववाडी हा नवीन रेल्वे मार्ग तसेच रत्नागिरी महामार्गासाठी निधी उपलब्ध होणार आहे. लघुउद्योगांत नव्याने येणाऱ्या कामगारांना पहिल्या तीन वर्षांसाठी प्रॉव्हिडंट फंड ८.३३ टक्के दराने सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून या कामगारांचे ईपीएफ खाते सुरू होणार आहे. शिवाय त्यांना न्यू पेन्शन स्कीमचा फायदा होणार आहे.

राज्यापाठोपाठ केंद्राचा सकारात्मक निर्णय
गेल्यावर्षी राज्य सरकारने अर्थसंकल्पात राज्यातील दहा विमानतळांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ९१ कोटींची तरतूद केली होती. यामध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश होता. याद्वारे कोल्हापूरच्या विमानतळ विकासाला बळ देण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकले. त्यापाठोपाठ आता केंद्र
सरकारने वापरात नसलेली विमानतळे वापरात आणण्याचा जाहीर केलेला निर्णय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने दिलासादायक ठरणारा आहे.

Web Title: The airport hopes for 'takeoff'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.