अजय कुंभार, किरण चव्हाणची ‘यूपीएससी’मध्ये बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:07 AM2018-04-28T01:07:32+5:302018-04-28T01:07:32+5:30
कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) येथील अजय गणपती कुंभार, (मूळ रा. किसरूळ, ता. पन्हाळा, सध्या रा. जयभवानी कॉलनी, फुलेवाडी) नागनवाडीतील (ता. चंदगड) शेतकरी कुटुंबातील किरण गंगाराम चव्हाण यांनी बाजी मारली. या परीक्षेत अजय याने देशात ६३१ वा, तर किरण याने ७७९ वा क्रमांक पटकविला.
‘यूपीएससी’ची पूर्वपरीक्षा जून २०१७ मध्ये, मुख्य परीक्षा आॅक्टोबर २०१७ मध्ये आणि मुलाखत एप्रिलच्या दुसऱ्या आणि तिसºया आठवड्यात झाली. तिचा निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर झाला. यामध्ये किसरूळ येथील अजय कुंभारने दुसºया प्रयत्नात यश मिळविले. त्याने सन २०१६ मध्ये पूर्वपरीक्षा दिली. मात्र, यात त्याला यश मिळाले नाही. गेल्यावर्षी त्याने पूर्व, मुख्य परीक्षा देऊन मुलाखतीत यश मिळविले. त्याचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर पाटपन्हाळा येथे, तर माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातील एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद महाविद्यालयात झाले. त्याने वालचंद महाविद्यालयातून बी. टेक.ची पदवी घेतली. यानंतर त्याने नवी दिल्ली येथे ‘यूपीएससी’ची तयारी सुरू केली. त्याचे वडील गणपती, आई शोभा या प्राथमिक शिक्षक आहेत. भाऊ अक्षय हा ‘केआयटी’ महाविद्यालयात शिकत आहे.
नागनवाडीचा किरण याने तिसºया प्रयत्नात हे यश मिळविले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण शिंगणापूर (ता. करवीर), माध्यमिक शिक्षण कुडाळ (सिंधुदुर्ग) मध्ये झाले. त्याने २०१५ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर पुण्यात राहून त्याने ‘यूपीएससी’ची तयारी सुरू केली. अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीने तयारी करून त्याने हे यश मिळविले.
चंद्रशेखर घोडके ७४५ वा
दरम्यान, या परीक्षेत कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचा विद्यार्थी चंद्रशेखर घोडके याने ७४५ व्या क्रमांकाने यश मिळविले. त्याचे मूळ गाव आंबेजोगाई (जि. बीड) आहे. त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. सन २०१४-१५मध्ये चंद्रशेखर हा प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये परीक्षेची तयारी करीत होता, अशी माहिती या सेंटरच्या संचालिका अंजली पाटील यांनी दिली.
या परीक्षेत दोन वेळा यशाने हुलकावणी दिली. त्यावर निराश झालो नाही. अभ्यासातील सातत्याच्या जोरावर अखेर यशस्वी झालो. मराठी माध्यमातून या परीक्षेत उत्तीर्ण झालो आहे. गेल्या तीन वर्षांतील कष्टाचे यशदायी फळ मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. - किरण चव्हाण
.
कष्टांचे चीज झाले
गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या कष्टांचे चीज झाल्याचा आनंद होत आहे. इंग्रजी माध्यमातून ‘यूपीएससी’ची परीक्षा दिली.‘यूपीएसीसी’ परीक्षा देण्याची प्रेरणा मला आजोबा नानासाहेब यांच्यापासून मिळाली. अभ्यासातील सातत्याच्या बळावर मी यश मिळविले. या परीक्षेतून ज्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल, त्या कामात प्रामाणिकपणे, निष्ठेने कार्यरत राहीन.
-अजय कुंभार