किरीट सोमय्या यांचा शिवसेनेवर निशाणा : विश्वासघाताचे उत्तर द्यावेच लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 02:47 PM2019-12-02T14:47:11+5:302019-12-02T14:52:17+5:30
राज्य व देशातील अनेक प्रश्नांवर लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविली; पण विधानसभेचा निकाल हाती येताच केवळ सत्तेसाठी टोकाचा विरोध असणाऱ्यांसोबत गेले. या मंडळींनी महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचा विश्वासघात केला असून, त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल, अशा शब्दांत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
कोल्हापूर : राज्य व देशातील अनेक प्रश्नांवर लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविली; पण विधानसभेचा निकाल हाती येताच केवळ सत्तेसाठी टोकाचा विरोध असणाऱ्यांसोबत गेले. या मंडळींनी महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचा विश्वासघात केला असून, त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल, अशा शब्दांत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर भाजपच्या शहर कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले, आपल्या मित्रपक्षाने भाजपच्या निर्मितीपासून अजेंठ्यावर असणारे काश्मीरचा प्रश्न, ३७० कलम, राज जन्मभूमी, समान नागरी कायदा अशा अनेक प्रश्नांवर एकत्रित निवडणुका लढविल्या; पण केवळ सत्तेसाठी पारंपरिक विरोधकांसोबत गेले.
आता भाजपच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. आगामी काळात अतिशय दक्षतेने कार्यरत राहावेच लागेल. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर लक्ष ठेवून जनतेच्या प्रत्येक पैशाचा योग्य वापर होतो का? यावर अंकुश ठेवा.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस अशोक देसाई, आर. डी. पाटील, अॅड. संपत पवार, दिलीप मेत्राणी, सुभाष रामुगडे, अजित ठाणेकर, विजय खाडे, मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, सुरेश जरग, आदी उपस्थित होते. विजय जाधव यांनी आभार मानले.
दगा देणाऱ्यांना धडा शिकविणार!
मित्र पक्षांसाठी आपणास लोकसभेच्या उमेदवारीचा त्याग करावा लागला. त्यांनीच संधी साधून दगा दिला. अशांना धडा शिकविण्यासाठी आपण मैदानात उतरल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला.