‘ताराराणी’कडून अजिंक्य चव्हाणच
By admin | Published: August 12, 2015 12:33 AM2015-08-12T00:33:35+5:302015-08-12T00:33:35+5:30
रामभाऊ चव्हाण : पद्माराजे उद्यान प्रभागाचा तिढा सामोपचाराने मिटविल्याची माहिती
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान (प्रभाग क्रमांक ५५) मधून वेताळमाळ तालमीचे उमेदवार म्हणून अजिंक्य शिवाजीराव चव्हाण यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती भाजपचे नेते रामभाऊ चव्हाण यांनी दिली. अजिंक्य याच्या उमेदवारीस बबनराव कोराणे, सम्राट कोराणे यांनी संमती दिली असून अजित राऊतही माझ्या ‘शब्दा’बाहेर नाहीत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. जागा ताराराणी आघाडीच्या वाटणीस आल्याने त्यांच्याकडून तो ंिरंगणात उतरेल, असेही त्यांनी सांगितले.
‘एक जागा व तीन उमेदवार’ अशी स्थिती निर्माण झाल्याने उमेदवारी नक्की कुणाला मिळणार याबद्दल उत्सुकता होती. ‘लोकमत’मध्ये मंगळवारच्या अंकात त्या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. अजिंक्य चव्हाण की सम्राट कोराणे यांच्यापैकी कुणाला उमेदवारी मिळणार या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मंगळवारी चव्हाण व कोराणे कुटुंबीय यांच्यात दोनवेळा चर्चा झाली. त्यामध्ये सामोपचाराने हा निर्णय झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही कधीच प्रभागाच्या राजकारणात पडलेलो नाही परंतु शिवाजीरावांची इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला एकवेळ संधी द्या, असे आमचे म्हणणे होते. त्यानुसार सकाळी सम्राट मला शिवाजी तरुण मंडळामध्ये येऊन भेटला व त्याने अजिंक्य याच्या उमेदवारीस पाठबळ दिले.’ दरम्यान, दुसऱ्या एका घडामोडीनुसार माजी नगरसेवक अजित राऊत व उत्तम कोराणे यांच्या गटाची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी उद्या, गुरुवारी शासकीय विश्रामधामवर सकाळी अकरा वाजता बैठक बोलावली आहे. या दोघांपैकी पक्षातर्फे कुणी लढायचे याचा निर्णय ‘त्या’ बैठकीत होणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
या वेळेला हा प्रभाग खुला झाल्याने तेथून निवडणूक लढविण्यासाठी मातब्बरांच्या उड्या आहेत. आता या प्रभागाचे माजी महापौर सुनीता राऊत या प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांना एकदा व त्यांचे पती अजित उर्फ पिंटू राऊत यांना एकदा वेताळमाळ तालमीने पाठबळ दिले. त्यामुळे त्यांनी या वेळेला थांबावे अशा हालचाली आहेत. राऊत यांचा व्यक्तिगत संपर्क चांगला आहे. त्यांनी विकासकामेही चांगली केली आहेत. खासगी कंपनीकडून करून घेतलेल्या सर्वेक्षणात या प्रभागातून ‘विजयाचे प्रबळ दावेदार’ म्हणून त्यांचे नाव पुढे आहे, असे असताना त्यांनी माघार घेणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया लोकांतून उमटल्या. त्यासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी राऊत यांचीही भेट घेऊन या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या. या उमेदवारीबाबतचा तिढा मुश्रीफ यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी त्यामध्ये लक्ष घातले.
राऊत व कोराणे हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यापैकी कुणी लढायचे हा निर्णय चर्चेतून घेतो व त्यानंतर पुढे काय करायचे ते ठरवू, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
१९९० च्या लढतीची आठवण
महापालिका निवडणुकीत सरदार तालीम प्रभागातून सन १९९० ला भिकशेठ पाटील विरुद्ध दिवंगत शिवाजीराव चव्हाण यांच्यात लक्षवेधी लढत झाली. त्यामध्ये पाटील १२२ मतांनी विजयी झाले होते. त्यामध्ये विजयी झाल्याने भिकशेठ पाटील यांना महापौरपदाची संधी मिळाली. हा पराभव चव्हाण कुटुंबीयांच्या मनात सल करून राहिला आहे, म्हणून शिवाजीराव यांच्याच मुलास रिंगणात उतरण्याचा त्यांचा निर्णय आहे.