अजिंक्य‘तारा’ जल्लोषात चमकला

By admin | Published: December 31, 2015 12:45 AM2015-12-31T00:45:32+5:302015-12-31T00:47:05+5:30

कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह : सतेज पाटील यांनी उघड्या जीपवरूनच स्वीकारल्या शुभेच्छा

Ajinkya 'star' shocked in the joker | अजिंक्य‘तारा’ जल्लोषात चमकला

अजिंक्य‘तारा’ जल्लोषात चमकला

Next

कोल्हापूर : अखंड जल्लोष... फटाक्यांची आतषबाजी...डॉल्बीचा दणदणाट, कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह असे वातावरण बुधवारी येथील ताराबाई पार्कातील अजिंक्यतारा कार्यालयावर राहिले. निमित्त होते, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील विजयाचे. सकाळी साडे नऊपासून दुपारी दोनपर्यंत समर्थक कार्यकर्ते अखंडपणे जल्लोष करत राहिले. या विजयामुळे कार्यकर्ते आणि पाटील कुटुंबीयांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली. आठपासून कार्यकर्ते अजिंक्यतारा कार्यालयाजवळ जिल्ह्यातील पाटील समर्थकांनी गर्दी केली होती. निकालाची माहिती सहज समजावी यासाठी कार्यालयाच्या आवारात मोठ्या स्क्रीनचा टीव्ही लावला होता. उपस्थित कार्यकर्ते टीव्हीवर; मोबाईलवरून संपर्क साधून माहिती घेत होते. प्रचंड चुरशीमुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजता सतेज पाटील विजयी झाल्याचे वृत्त ‘अजिंक्यतारा’वर समजताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. अतिउत्साही कार्यकर्ते मोटारसायकलच्या सायलन्सरची पुंगळी काढून परिसर व शहरात वावरत राहिले. कार्यालय आणि परिसर गुलालाने माखला. काही कार्यकर्ते ‘आमदार सतेज पाटील’ असा फलक आणि काँग्रेसचा ध्वज घेऊन जल्लोष करीत होते. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पोलिसांनी काही काळ कार्यालयासमोरील रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली.
या विजयाने विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढल्याचा जोश प्रत्येक समर्थकांत स्पष्टपणे दिसून येत होता. ‘आमचे साहेब, पुन्हा आमदार झाले’ अशी कार्यकर्त्यांत प्रतिक्रिया होती. सकाळी अकरानंतर सतेज पाटील ‘अजिंक्यतारा’मध्ये कधी येतात याची प्रतीक्षा करीत कार्यकर्ते थांबले. महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य कार्यालयात येऊन बसले होते. दुपारी एक वाजता सतेज पाटील कार्यालयासमोर आले. त्यांच्यासोबत मुलगा तेजस, भाऊ संजय पाटील, पुतणे ऋतुराज, पृथ्वीराज हेही आले. आल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. उघड्या जीपवर थांबूनच कार्यकर्त्यांचे शुभेच्छा स्वीकारल्या. त्यांना हस्तांदोलन करण्यासाठी झुंबड उडाली होती. त्यातूनही प्रत्येकाशी हस्तांदोलन, पुष्पहार, गुच्छ स्वीकारत तब्बल अर्धा तास त्यांनी जीपवर थांबूनच शुभेच्छा स्वीकारल्या. तेथेच महापौर रामाणे यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेविका, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, सदस्यांनी भेटून पुष्पगुच्छ दिले. दुपारी दोन वाजता शुभेच्छा स्वीकारून सतेज पाटील यांनी ‘अजिंक्यतारा’ सोडले.


कार्यालयातील छायाचित्रांनाही गुलाल...
कार्यालयात विविध कक्षांत सतेज पाटील यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमांतील छायाचित्रे मोठी करून लावली आहेत. कार्यकर्त्यांनी विजयानंतर समोर दिसेल त्या कार्यकर्त्याला गुलाल लावलाच शिवाय कार्यालयातील पाटील यांच्या छायाचित्रांनाही गुलाल लावून मोबाईलवर काही कार्यकर्त्यांनी सेल्फी टिपले.

‘जिल्ह्याचा वाघ...’
शिये (ता. करवीर) येथील समर्थकांनी कार्यालयासमोर आमदार सतेज पाटील यांचा ‘जिल्ह्याचा वाघ’ असा लिहिलेला फलक लावला होता. ‘अजिंक्यतारा’ प्रेमींकडून एका बाजूला सतेज पाटील आणि दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण यांचा फोटो असलेला आणि ‘साहेब इज आॅलव्हेज राईट’, ‘तीनपैकी तीन विजयी, हार्दिक अभिनंदन’ असे लिहिलेला डिजिटल फलक लावला होता.

Web Title: Ajinkya 'star' shocked in the joker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.