‘अजिंक्यतारा’ गुलालात रंगला
By Admin | Published: November 3, 2015 12:22 AM2015-11-03T00:22:22+5:302015-11-03T00:23:33+5:30
गाण्याचा ठेका : सतेज पाटील समर्थक, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोल्हापूर : फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, भिरभिरणारे काँग्रेसचे झेंडे आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जयजयकाराने ‘अजिंक्यतारा’ कार्यालयाचा परिसर सोमवारी दुमदुमून गेला. महानगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री पाटील यांनी एकहाती २७ जागा मिळविल्याचा जोरदार जल्लोष काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांनी केला. तब्बल साडेपाच तास याठिकाणी त्यांचा जल्लोष सुरू होता.
निकालाची प्रक्रिया संपल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास माजी मंत्री पाटील हे ताराबाई पार्क अजिंक्यतारा कार्यालयात आले. त्यांच्यापाठोपाठ डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील आले. त्यांनी माजी मंत्री पाटील यांना शुभेच्छा दिल्या. याठिकाणी ते आले असल्याचे समजताच कार्यकर्ते आणि समर्थकांनी गर्दी केली. कार्यालयाच्या आवारात ध्वनियंत्रणेवरील गाण्यांच्या ठेक्यावर युवा कार्यकर्त्यांनी नृत्याचा ठेका धरला, शिवाय त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच माजी मंत्री पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी कार्यकर्ते, समर्थकांनी परिसर दुमदुमून सोडला. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी माजी मंत्री पाटील हे ऋतुराज पाटील यांच्यासमवेत येताच कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत. त्यांच्यावर गुलालाची उधळण करून जोरदार जल्लोष केला.
कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसंडून वाहत होता. दरम्यान, बलराम कॉलनीतून अपक्ष निवडून आलेल्या राहुल माने यांनी माजी मंत्री पाटील यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)
कार्यकर्र्त्यांचे कष्ट, बळामुळेच यश : पाटील
कार्यकर्त्यांचे कष्ट, त्यांनी दिलेले बळ आणि शहरवासीयांनी टाकलेल्या विश्वासामुळेच महापालिकेत मोठे यश मिळविता आले. त्याचे भान मला असून, शहरवासीयांना दिलेला विकासाचा ‘शब्द’ पाळण्यासाठी पाठबळ द्या, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी केले. अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, कोणावरही टीका-टिप्पणी करण्याऐवजी विकासाचा मुद्दा घेऊन कार्यरत राहिल्याने शहरवासीयांनी माझ्यावर विश्वास टाकून मोठे यश मिळवून दिले. त्यामुळे माझ्यासह आता प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी वाढली आहे. शहरवासीयांना निवडणुकीपूर्वी दिलेला विकासाचा ‘शब्द’ पूर्ण करणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद, साथ कायम राहणे महत्त्वाचे आहे.
ऋतुराज पाटील यांची साथ
या निवडणुकीत माजी मंत्री पाटील यांना त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांची मोठी साथ लाभली. कसबा बावडा येथील प्रभागांतील प्रचाराची धुरा ऋतुराज यांनी माजी मंत्री पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सांभाळली. याबद्दल अनेकांनी त्यांना भेटून त्यांचे कौतुक केले.