अजिंक्यतारा गुलालात न्हाला, तरुणाईचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 04:31 PM2019-10-24T16:31:31+5:302019-10-24T16:34:33+5:30
अजिंक्यताराच्या चौकात येणाऱ्या रस्त्यांवर सगळीकडे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. हातात काँग्रेसचे झेंडे, गळ्यात स्कार्फ घालून विजयोत्सव सुरू होता. आकर्षक कागदी बॉम्ब फोडले जात होते. संध्याकाळी उशीरापर्यंत हा जल्लोष थांबला नव्हता आणि तरुणाईचा उत्साह कमी झालेला नव्हता.
कोल्हापुर दक्षिणमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यामुळे सकाळपासूनच अजिंक्यतारा बाहेर तरुणाईचा जल्लोष सुरू होता. गुलालाची उधळण, कागदी आतषबाजी, आणि विजयी घोषणांनी अजिंक्यतारासह ताराबाई पार्क परिसर दणाणून गेला.
मतमोजणीच्या एक एक फेरीचे निकाल बाहेर पडू लागले तशी ऋतुराज पाटील यांच्या विजयोत्सवाचा जल्लोष सुरू झाला. सकाळपासून अजिंक्यताराबाहेर तरुण कार्यकर्त्यांची गर्दी होती. कार्यकर्ते गुलालाची उधळण करत होते. सायलेंसर काढून गाड्या फिरवत होते. फक्त कार्यकर्तेच नव्हे तर अवघा परिसर, वाहने आणि रस्तेही गुलालात रंगून गेले होते. दुपारी दोनच्या दरम्यान तर अजिंक्यताराकडे येणारे रस्तेही पॅक झाले होते.
सासणे ग्राऊंड, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय व धैर्यप्रसाद हॉल या चारही ठिकाणाहून अजिंक्यताराच्या चौकात येणाऱ्या रस्त्यांवर सगळीकडे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. हातात काँग्रेसचे झेंडे, गळ्यात स्कार्फ घालून विजयोत्सव सुरू होता. आकर्षक कागदी बॉम्ब फोडले जात होते. संध्याकाळी उशीरापर्यंत हा जल्लोष थांबला नव्हता आणि तरुणाईचा उत्साह कमी झालेला नव्हता.