कऱ्हाडनंतर अजित पवारांच्या दारात धरणे
By admin | Published: June 21, 2014 01:00 AM2014-06-21T01:00:05+5:302014-06-21T01:00:45+5:30
टोलविरोधी कृती समितीचा निर्णय : २६ जून रोजी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार
कोल्हापूर : राजर्षी शाहू जयंतीदिवशी २६ जूनला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दारात कऱ्हाड येथे एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात बारामतीला आंदोलन करण्यात येईल. याची तारीख नंतर जाहीर करू, असे सांगून २६ जूनला सकाळी नऊ वाजता कार्यकर्त्यांनी दसरा चौकात हजर राहण्याचे आवाहन टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकार परिषदेत केले.
मिरजकर तिकटी येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात टोलविरोधी कृती समितीची बैठक झाली. कऱ्हाड येथे मुख्यमंत्र्यांच्या दारात करावयाच्या लाक्षणिक उपोषणाची तयारी करण्यात आली. वाहने, कार्यकर्त्यांची सोय, मार्ग, निघण्याची वेळ, आदींवर चर्चा झाली. गुरुवारी सकाळी
नऊ वाजता दसरा चौक येथे जमण्याचे ठरले आहे. कोल्हापूर टोलमुक्त करण्याच्या उद्देशाने प्रत्येकाने वाहनासह हजर रहावे. कऱ्हाडपर्यंत जाणारी ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येईल. कोल्हापूरच्या परंपरेला शोभेल अशी
ही रॅली अन् आंदोलन असेल असे साळोखे यांनी स्पष्ट केले.
आंदोलनात कोल्हापूर बार असोसिएशन, लॉरी असो. टेम्पो व आॅटो रिक्षा युनियन, खासगी बस असो. आदीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यावेळी बार असो.चे अध्यक्ष विवेक घाटगे, रामभाऊ चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, गणी आजरेकर, बाबा इंदुलकर, जयकुमार शिंदे, दिलीप देसाई, किसन कल्याणकर, लाला गायकवाड, अशोकराव साळोखे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)