आजरा कारखाना येत्या गळीत हंगामात स्वबळावर सुरू करणार- अध्यक्ष शिंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:24+5:302021-03-28T04:23:24+5:30
आजरा : आजरा साखर कारखान्याबाबत नेतेमंडळींनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या गळीत ...
आजरा : आजरा साखर कारखान्याबाबत नेतेमंडळींनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात कारखाना स्वबळावर सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. ते कारखान्याच्या ३० व्या ऑनलाइन वार्षिक सभेत बोलत होते.
उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी यांनी स्वागत केले. कारखाना गेल्या दोन हंगामात बंद आहे. साखरेच्या दरात मंदी असल्याने कारखान्यांची आर्थिक घडी विसकटली. भाडेतत्त्वावर देण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही. अखेर जिल्हा बँकेचा एन.पी.ए. वाढल्याने सध्या कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. स्वबळावर सुरू करण्याबाबत संचालक मंडळाचे प्रयत्न व नेतेमंडळींचे सहकार्य आहे. त्यामुळे भविष्यात हा कारखाना चांगला चालू शकतो, असा आशावाद प्रास्ताविकात अध्यक्ष शिंत्रे यांनी व्यक्त केला. आर्थिक पत्रकांचे वाचन प्रभारी कार्यकारी संचालक प्रशांत चव्हाण यांनी केले. मागील सभेचे वृत्तांत वाचन कार्यालयीन अधीक्षक अनिल देसाई यांनी केले.
सभेत कोरोनानंतर सभा घ्या, संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने निवडणुका न घेता प्रशासक मंडळ किंवा आहे त्या संचालक मंडळाला मुदतवाढ द्या, आर्थिक पत्रकांची माहिती सभासदांना पीडीएफ फाईलमधून द्यावी, उत्पादक सभासदांचे टनामागे रुपये ५०० चा हप्ता द्या, सहकाराचे कारखाने डबघाईला व खाजगी चांगले चालतात मग ऊस उत्पादक सभासदांनी नेमके काय करावे, जिल्हा बँकेने राजकीय अभिलाषेपोटी आजरा कारखान्याला कर्ज दिले नाही का?, जिल्हा बँकेने अन्य किती कारखान्यांना थकहमीची रक्कम दिली, असे प्रश्न विचारले. शासनाच्या नियमाच्या अधीन राहून सभासदांनी केलेल्या सूचनांचे पालन केले जाईल, असे अध्यक्ष शिंत्रे यांनी सांगितले.
चर्चेत संपत देसाई, उदय पवार, युवराज पोवार, शिवाजी वांगणेकर यांनी भाग घेतला. सभेला सर्व संचालक उपस्थित होते.
निर्यात अनुदानानंतर रक्कम देऊ.... जिल्हा बँकेकडून साखरेची विक्री सुरू आहे. कारखाना चालवायला कोणी घेत नाही. स्वबळासाठी संचालकांचे योग्य प्रयत्न नाहीत, मग शेतकऱ्यांचा टनामागे रुपये ५०० चा हप्ता कधी देणार, असा सवाल युवराज पोवार यांनी केला. याबाबत निर्यात अनुदान मिळाल्यानंतर अशी रक्कम दिली जाईल, असे अध्यक्ष शिंत्रे यांनी सांगितले.