आजरा घनसाळ, काळा जिरगा'चे सुधारित नवे वाण तयार, शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:03 PM2022-03-10T16:03:02+5:302022-03-10T16:03:40+5:30

अकृषी विद्यापीठांतर्गत अशा प्रकारचे संशोधन कार्य राज्यात प्रथमच झालेले आहे,

Ajra Ghansal Improved New Varieties of Kala Jirga, Research by Department of Botany Shivaji University | आजरा घनसाळ, काळा जिरगा'चे सुधारित नवे वाण तयार, शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधन

आजरा घनसाळ, काळा जिरगा'चे सुधारित नवे वाण तयार, शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधन

Next

कोल्हापूर : आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या प्रचंड मागणी असलेल्या सुप्रसिद्ध तांदळाच्या सुगंधी वाणांच्या सुधारित जाती शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी तयार केल्या आहेत. हे वाण शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी सिद्ध आहेत. अकृषी विद्यापीठांतर्गत अशा प्रकारचे संशोधन कार्य राज्यात प्रथमच झालेले आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. एन.बी. गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली.

कोल्हापूर जिल्हा भाताच्या अनेक खास देशी वाणांनी समृद्ध आहे. त्यांना ग्राहकांची मोठी पसंती आहे. यामध्ये व्यापाऱ्यांकडून तसेच ग्राहकांकडून प्रचंड मागणी असलेल्या आजरा घनसाळ आणि काळा जिरगा या दोन सुप्रसिध्द उत्तम सुगंधित तांदळाच्या जातींचा समावेश आहे. या सुगंधी देशी वाणांमध्ये खनिजे आणि इतर पोषकतत्त्वे मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळेही त्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

या देशी वाणांमध्ये अधिक उंची, अल्प उत्पन्न आणि परिपक्व होण्यासाठी लागणारा दीर्घ कालावधी अशा काही समस्या आहेत. यामुळेच त्यांची लागवड मर्यादित भागांमध्ये केली जाते. ही बाब लक्षात घेऊन प्रा. गायकवाड आणि अधिविभागातील संशोधक विद्यार्थी शीतलकुमार देसाई व अकेश जाधव यांनी या दोन देशी वाणांच्या अनुवांशिक गुणांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा तसेच त्यांचे उत्पादन वाढवण्याचा संशोधन प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पांसाठी डीएई-बीआरएनएस, मुंबई आणि डीएसटी-एसईआरबी, नवी दिल्ली यांनी या देशी भातांच्या वाणांचे सुधारीकरण कार्यक्रमाअंतर्गत अनुक्रमे ३२ लाख व ४० लाख रुपयांचा निधी दिला होता.

विविध प्रकारच्या म्युटेजेनिक एजन्टचा वापर करून या पिकांच्या सहा पिढ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामधून अधिक उत्पादन देणारे, लवकर परिपक्व होणारे कमी उंचीचे आणि आडवे न पडणारे असे गुणधर्म असणारे वाण विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. अकृषी विद्यापीठांतर्गत अशा प्रकारचे संशोधन होण्याची ही पहिलीच घटना आहे, असेही त्यांनी सांगितले.

४८ देशी वाणांचे संकलन

कोल्हापूर जिल्ह्यातून ९ सुवासिक आणि ३९ असुवासिक अशा एकूण ४८ भातांच्या देशी वाणांच्या प्रजाती संकलित केल्या आहेत. २०२० आणि २०२१ या सलग दोन वर्षांच्या खरीप हंगामात त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील शेतकरी, महिला आणि पुरूषांच्या बचत गटांना या संकलित केलेल्या देशी वाणांचे संवर्धन करण्यासाठी वितरण केले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

या संशोधनासाठी विभागातील डॉ. व्ही.ए. बापट, कोल्हापूरचे कृषी अधीक्षक, आजरा तालुका कृषी अधिकारी आणि आजरा घनसाळ संघ, आजरा यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ajra Ghansal Improved New Varieties of Kala Jirga, Research by Department of Botany Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.