आजरा पोलीस व वनविभागाची कारवाई, जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 09:30 PM2023-05-27T21:30:22+5:302023-05-27T21:31:50+5:30
याप्रकारामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
उत्कर्षा पोतदार, लोकमत न्यूज नेटवर्क, उत्तूर (ता.आजरा): आजरा-आंबोली मार्गावर गवसे (ता. आजरा) नजिक १० कोटी ७४ लाख रूपयांची व्हेल माशाची उलटीची तस्करी करताना जप्त करण्यात आली. आजरा पोलीस व वनविभागाने शनिवार (ता.27) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
याप्रकरणी शिवम किरण शिंदे (वय २३, रा. अभिनव नगर नं. २ कुडाळ जि. सिंधुदुर्ग) या मुख्य सुत्रधारासह अकबर याकूब शेख (वय ५१, रा. पिंगोली, मुस्लमवाडी, ता कुडाळ), गौरव गिरीधर केरवडेकर (वय ३३, रा. केरवडे तर्फ माणगाव, ता. कुडाळ), इरफान इसाक माणियार (वय ३६, रा. पोष्ट ऑफीस गणेश नगर, कुडाळ), फिरोज भाऊद्दीन ख्वाजा (वय ५३, रा. कोलगाव, ता. सावंतवाडी) यांना पोलीसांनी ताब्यांत घेतले आहे. तसेच एक चारचाकी व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकारामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
आजर्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांना गोपनीय बातमीदाराकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आजरा तालुका मार्गे व्हेल माशाची उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधिक्षक पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हारूगडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी पोलीसांचे एक पथक तयार केले. या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून आजरा-आंबोली मार्गावर गस्त सुरू केली.
या पथकाने आंबोली पर्यंत तसेच परिसरातील जंगलभाग, धरणभागात गस्त सुरू केली. त्याचबरोबर घाटकरवाडी (ता. आजरा) येथे नाकाबंदी सुरू करून कोकणातून येणार्या दुचाकी व चारचाकी गाड्यांची तपासणी सुरू केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गवसे जवळ टाटा सफारी (एमएच ०१ बीसी ०५९०) या गाडीची तपासणी केली. यात असणार्या तीघांजणांकडे पोलीसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला.
त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू केली. तसेच त्यांचे मोबाईल तपासण्यात आले. त्यांचे व्हेल माशाच्या उलटी तस्करीशी लागेबंध असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला. यावेळी मोटारसायकलवरून (एमएच ०७ एडी ७७५८) येणार्या दोघांकडे काळ्या सॅकमध्ये व्हेल माशाची उलटी असल्याचे अढळून आले. यावेळी दोन शासकीय पंच व वनविभागाचे दोन अधिकारी यांच्यासमवेत तस्करीच्या मालाची पहाणी केली असता ती व्हेल माशाची उलटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.
व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १० कोटी ७४ लाख आहे. पोलीस पथकात सपोनि हारूगडे, उपनिरीक्षक जाधव यांच्यासह दत्तात्रय शिंदे, प्रशांत पाटील, विशाल कांबळे, विकास कांबळे, प्रदीप देवार्डे यांचा समावेश होता. परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांच्या मार्गदर्शनाखाली बाळेश न्हावी व गुरूनाथ नावगेकर हे वनकर्मचारी उपस्थित होते.