आजरा पं.स. मासिक सभेवर सभापती अविश्वास ठरावचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:28 AM2021-08-27T04:28:05+5:302021-08-27T04:28:05+5:30
गटविकास अधिकारी बी.डी. वाघ यांनी स्वागत केले. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये जिल्ह्यात आजरा तालुक्याने विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गटविकास ...
गटविकास अधिकारी बी.डी. वाघ यांनी स्वागत केले. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये जिल्ह्यात आजरा तालुक्याने विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गटविकास अधिकारी बी.डी. वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. रिलायन्स कंपनीचे पीक विमा योजना सुरू असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पोल्ट्रीचे पंचनामे केले आहेत. हालेवाडी व गजरगाव येथे नवीन प्राथमिक शिक्षक हजर झाले आहेत. कोरोनामुळे सर्वत्र ऑनलाइन अध्यापन सुरू आहे असे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. प्राथमिक शिक्षकांना दुर्गम भागातील रिक्त जागांचा प्राधान्यक्रम डावलून गावे दिली असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रामपंचायत विभागाकडील १५ वा वित्त आयोग अखर्चित रक्कम खर्च करण्यासाठी तांत्रिक बाबींचा निपटारा तत्काळ करण्याच्या सूचना करण्यात आल्या. कोरोना पॉझिटिव्ह रेट १.३३ इतका असून तालुक्यात सर्वत्र लसीकरण सुरू आहे असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. रचना कदम यांनी आभार मानले. पंचायत समितीच्या आजच्या सभेला सहापैकी उपसभापतीसह चार सदस्य गैरहजर होते. सभापती उदय पवार यांचेवरील अविश्वास ठराव व न्यायालयीन प्रक्रियेचे सावट आजच्या सभेवर जाणवले. सभेला अनेक अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती. तर तालुक्यात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. एस.टी.अभावी शाळा, महाविद्यालय सुरू करण्यात अडचणी येत आहे. अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घरांची पडझड ही झाली आहे मात्र त्यावर सभेत चर्चा झालीच नाही.