आजरा साखर कारखाना बेअरींग चोरीप्रकरण: प्रभारी कार्यकारी संचालकासह पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 01:26 PM2022-06-10T13:26:11+5:302022-06-10T13:26:41+5:30
कारखान्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना बेअरींग चोरी प्रकरणी अटक झाल्यामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ
आजरा : आजरा साखर कारखान्यातील बेअरींग चोरीप्रकरणी पाच जणांना आजरा पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपी मध्ये स्क्रॅप खरेदीदार, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक, सेवानिवृत्त सुरक्षा मुख्याधिकारी, स्टोअर कीपर, सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कारखान्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना बेअरींग चोरी प्रकरणी अटक झाल्यामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
बेअरींगची अंदाजे किंमत ३ लाख रुपये
आजरा साखर कारखान्यावरून २७ फेब्रुवारी २०१९ ते २७ जुलै २०१९ या कालावधीत २७० किलोची ४ व ९२ किलोची २ बेअरींग अशी ६ बेअरींग अंदाजे ३ लाख ५ हजार २०० रुपये किंमतीची चोरीस गेली. याबाबतची फिर्याद तत्कालीन कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण यांनी आजरा पोलिसात दिली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात स्क्रॅप खरेदीदार जेन्युअल शमशाद खान ( रा. योगायोग नगर, पुजारी मळा इचलकरंजी ) तत्कालीन कार्यकारी संचालक प्रकाश रामचंद्र चव्हाण ( वय ५२ रा. पेद्रेवाडी ) स्टोअर कीपर दिनकर उर्फ गुलाब बाबुराव हसबे ( रा.चांदेवाडी ) सेवानिवृत्त सुरक्षा मुख्य अधिकारी भरत गणपती तानवडे ( ६२ रा. देवर्डे ) सुरक्षारक्षक मनोहर यशवंत हसबे ( ४९ रा.चांदेवाडी ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उप अधीक्षक राजीव नवले, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, सहाय्यक फौजदार बी.एस. कोचरगी, शिवाजी बामणे, संतोष गस्ती, दत्तात्रय शिंदे, अजित हट्टी यांनी बेअरींग चोरी प्रकरणाचा तपास केला.