आजरा तालुक्याचे लक्ष मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:39 PM2020-10-09T12:39:06+5:302020-10-09T12:45:18+5:30
kolhapur, Sugar factory, hasanmusrif तिसऱ्यांदा खासगी कंपनीकडे जाणारा आजरा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहू देण्याबाबत आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण आजरा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. हा सकारात्मक निर्णय तातडीने झाल्यासच आजरा कारखान्याचे अडलेले गाडे रुळावर येण्याची शक्यता आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : तिसऱ्यांदा खासगी कंपनीकडे जाणारा आजरा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहू देण्याबाबत आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण आजरा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. हा सकारात्मक निर्णय तातडीने झाल्यासच आजरा कारखान्याचे अडलेले गाडे रुळावर येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीचा गळित हंगाम घेता आलेला नव्हता. संचालक मंडळ आणि कारखाना कर्मचारी यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. जिल्हा बँकेचे कर्जाचे हप्तेही रखडले. परिणामी कारखाना चालविण्यासाठी निविदा काढण्यात आली. मात्र यासाठी केवळ एकाच कंपनीची निविदा आल्याने ती जिल्हा बँकेच्या २५ सप्टेंबरच्या बैठकीत रद्द केली.
याच बैठकीत जिल्हा बँक आणि कारखाना व्यवस्थापनामध्ये कारखाना स्वबळावर चालविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. कर्मचाऱ्यांनी पगारकपातीसाठी लेखी तयारी दर्शवली तरच हे होणार असल्याने, तसे लेखी पत्रही बँकेला सादर करण्यात आले आहे.
संचालकांनी बँकेला दिलेल्या पत्रातील मुद्दे
१. कर्मचारी पगारामध्ये कपात
२. उत्पादन खर्चामध्ये काटकसर
३. ४ लाख टन उसाची गाळपासाठी उपलब्धता
४. तोडणी व वाहतुकीसाठी २५० टोळ्यांची गरज. स्थानिक पातळीवर यंत्रणा उपलब्ध
५. मशिनरी दुरुस्ती व देखभालीसाठी २० कोटींची गरज
६. शासकीय मूल्यांकनानुसार कारखान्याच्या मालमत्तेचे १०४ कोटी रुपये मूल्यांकन झाले आहे.
७. जिल्हा बँकेचे माल तारण कर्ज सोडून ४० कोटी रुपयांचे कारखान्यावर कर्ज
८. गळित हंगाम सुरू करण्यासाठी आणखी ४५ कोटींच्या कर्जाची गरज.
लोकमतच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब
गेल्या वर्षी कारखाना अडचणीत आला असताना ह्यलोकमतह्णने दोन भागांच्या मालिकेद्वारे कुणीही, काहीही म्हणाले तरी कामगारांच्या त्यागावरच कारखाना चालविण्यासाठी घेणे अवलंबून राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. तेव्हा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत आकांडतांडव केले होते. मात्र जिल्हा बँकेच्या चर्चेतही कर्मचाऱ्यांच्या पगाराचाच मुद्दा पहिल्या क्रमांकावर राहिला आणि कर्मचाऱ्यांनी पगार कपातीला तयार असल्याची स्वागतार्ह भूमिका घेतली.
मुश्रीफच आधारवड
अनेक वर्षे बंद पडलेला चंदगडचा दौलत साखर कारखाना हसन मुश्रीफ यांच्याच पुढाकाराने आजरा तालुक्याचे सुपुत्र मानसिंग खोराटे चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. मुश्रीफ यांनीच निर्णय घेतल्यामुळे गडहिंग्लजचा साखर कारखाना पुण्याच्या कंपनीकडून चालविण्यात येत आहे. आता आजरा कारखान्याबाबतीत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मुश्रीफच याबाबत निर्णय घेऊ शकतात. फक्त त्यांनी तो तातडीने घेतल्यास यंदाचा गळित हंगाम पदरात पडण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर पडण्यापासून वाचणार आहेत.
महाविकास आघाडीवाले एकत्र
कारखान्याचे अध्यक्षपद सध्या शिवसेनेच्या सुनील शिंत्रे यांच्याकडे आहे. त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुश्रीफ यांच्याकडे याबाबत आग्रह धरला आहे. संचालक मंडळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस, भाजपवालेही आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही आजरा कारखाना सुरू करणे हे महाविकास आघाडीच्या फायद्याचे असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीही तसा आग्रह धरला आहे.